‘तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही’; नाकाबंदीत अडविल्याने दुचाकीस्वारांची पोलिसाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 07:35 PM2021-05-17T19:35:25+5:302021-05-17T19:36:20+5:30
Crime News in Aurangabad जलाल फारुकी अझहर फारुकी (२१) आणि मोहम्मद वाजेद मोहम्मद शफिक (१९, दोघे रा. आसेफिया कॉलनी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
औरंगाबाद : ‘तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही’, असे म्हणत दुचाकीस्वार दोघांनी पोलिसास मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजता चेलीपुरा रस्त्यावर नाकाबंदीदरम्यान घडली. त्या दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे आणि लोकसेवकाला मारहाण करण्यासह अन्य कलमानुसार सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.
जलाल फारुकी अझहर फारुकी (२१) आणि मोहम्मद वाजेद मोहम्मद शफिक (१९, दोघे रा. आसेफिया कॉलनी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तक्रारदार पोलीस कॉन्स्टेबल मनोहर विष्णू बोर्डे हे शहर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कार्यकक्षेतील दंगा काबू पथकात (आरसीपी) कार्यरत आहेत. फौजदार गांगुर्डे यांच्यासह हे पथक चेलीपुरा चौकात सोमवारी सकाळी फिक्स पॉइंटवर तैनात होते. चंपाचौकाकडून आलेल्या दुचाकीस्वार (एमएच २० डीआर १९०२) दोघांना बोर्डे यांनी हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. त्यांना हुलकावणी देऊन ते पुढे जाऊ लागले.
यामुळे बोर्डे हे त्यांना आडवे झाले आणि दुचाकीचे हॅण्डल धरून त्यांना रस्त्याच्या बाजूला दुचाकी घेण्यास सांगितले. तरीही पोलिसांचे न ऐकता दुचाकीस्वार पुढे जाऊ लागला. दुचाकीवर मागे बसलेल्या आरोपीने, ‘तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही’, असे म्हणून मारहाण सुरू केली. हा प्रकार पाहून फौजदार गांगुर्डे आणि अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी दुचाकीस्वार दोन्ही तरुणांना पकडले. बोर्डे यांच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलीस ठाण्यात आरोपी जलाल फारुकी आणि मोहम्मद वाजेदविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली.