शॉर्टकटसाठी दुचाकीस्वार घालतात जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:04 AM2021-03-19T04:04:52+5:302021-03-19T04:04:52+5:30
औरंगाबाद : सिमेंट रस्त्याचे काम सुरू असल्याने जाफरगेटसमोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे; मात्र शॉर्टकट मारण्यासाठी वाहनधारक नाल्याच्या निमुळत्या काठावरून ...
औरंगाबाद : सिमेंट रस्त्याचे काम सुरू असल्याने जाफरगेटसमोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे; मात्र शॉर्टकट मारण्यासाठी वाहनधारक नाल्याच्या निमुळत्या काठावरून जीव धोक्यात घालून दुचाकी चालवत आहेत. किंचित अंदाज चुकला तर गाडीसकट दुचाकीस्वार सरळ नाल्यात पडून जीव गमावू शकतो, हे नक्की; मात्र अपघाताचा विचार न करता लवकर जाण्याच्या घाईत दुचाकीस्वार कसरत करत आहेत.
मोंढा नाका ते जाफरगेटकडे जाणाऱ्या मार्गाचे सिमेंट रस्ता तयार करणे सुरू आहे. मागील १५ वर्षीच्या आंदोलनानंतर हा रस्ता तयार होत आहे. लक्ष्मी चावडी ते जाफरगेट रस्त्यावर आडवा एक नाला आहे. त्यावरील पूलही पडका झाला आहे. रस्त्याचे काम येथेच येऊन थांबले आहे. याच ठिकाणी आडवा खड्डा खोंदून वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात आला आहे. वाहनधारकांना मोंढ्यात जाण्यासाठी लक्ष्मी चावडी, बीएसएनएल ऑफिस, गांधीनगर मार्गे जाफरगेट समोरून मोंढ्यात यावे- जावे लागते. हा थोडा लांबचा मार्ग वाचविण्यासाठी शॉर्टकट म्हणून दुचाकीस्वार पूल व नाल्याच्या निमुळत्या कड्याने वाहन घेऊन जात आहेत. दोन्ही बाजूने सिमेंटचा उंच रस्त्याचा काठ व नाला यांच्यामध्ये खड्डे आहे. त्यात एक निमुळता दगड टाकण्यात आला आहे. त्यावरून दुचाकी नेली जात आहे. अंदाज चुकला दगड किंचित सरकला तर वाहनधारक गाडीसह नाल्यात जाऊन पडणारच; मात्र जीव गमविण्याचा धोका पत्करून दुचाकीधारक त्याच खड्ड्यातून जात आहेत.
चौकट
दे धक्का
आमच्या प्रतिनिधीने या ठिकाणी पाहणी केली तेव्हा अनेक गाड्या खड्ड्यातून जाताना बंद पडल्या. एकीकडे दुचाकींचे ओझे दुसरीकडे नाला, अशी तारेवरची कसरत करत दुचाकी ढकलत वाहनधारक पुढे जाताना दिसले.