जीप व ट्रॅव्हल्सच्या अपघातात दोन महिला ठार; अहमदनगर रोडवर अपघाताची मालिका सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 05:37 PM2018-04-25T17:37:28+5:302018-04-25T17:38:43+5:30
जिकठाण येथे आरोग्य केंद्राची जीप व खाजगी ट्रॅव्हल्सच्या अपघातात दोन महिला ठार झाल्या तर ९ महिला गंभीर जखमी आहेत.
औरंगाबाद : जिकठाण येथे आरोग्य केंद्राची जीप व खाजगी ट्रॅव्हल्सच्या अपघातात दोन महिला ठार झाल्या तर ९ महिला गंभीर जखमी आहेत. आज पहाटे ४.३० च्या सुमारास झालेल्या या अपघातात जानकाबाई जनार्धन पवार (६०, रा. दिघी ता. गंगापुर ) व ताराबाई ज्ञानेश्वर बहाद्दुरे (५०, रा.लहान्याचीवाडी ता .फुलंब्री ) या मृत झाल्या.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मंगळवारी (दि.२४ )भेंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महीलांचे लेप्रोस्कोपी कुंटुबकल्याण आॅपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज पहाटे जिकठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासकीय वाहन ( एमएच २० - डब्यु - ९५७३) हे शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना घरी सोडण्यासाठी निघाले. भेंडाळा येथुन जिकठाण गावाकडे येत असताना पुणे येथुन औरंगाबादकडे भरधाव जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सने (एमएच ०९ - बीसी -९५४०) त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे दोन्ही वाहने दूर फेकली गेली. यात जीपमधील महिला गंभीर जखमी झाल्या. यात जानकाबाई जनार्धन पवार (६०, रा. दिघी ता. गंगापुर ) व ताराबाई ज्ञानेश्वर बहाद्दुरे (५०, रा.लहान्याचीवाडी ता .फुलंब्री ) या उपचारा दरम्यान मृत झाल्या.
या घटनेची माहिती मिळताच जिकठाणचे सरपंच उमर पटेल, कैलास खोमणे, डॉ. उज्वल चव्हाण, वाळुज पोलीस ठाण्याचे सहायक फोजदार दत्तात्रय साठे भाले यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी शासकीय वाहन चालक रविंद्र गोरे यांच्या फिर्यादिवरुन खाजगी ट्रॅव्हल्सच्या चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून पळणाऱ्या चालकाला तत्काळ अटक केली.