हडकोत पंधरा मिनिटांत पळवले दोन महिलांचे मंगळसूत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:15 PM2019-07-12T23:15:45+5:302019-07-12T23:16:05+5:30
हडको एन-११ येथील रवीनगर आणि सुदर्शननगर येथे अंगण झाडणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन मिनीगंठण चोरट्यांनी हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी घडली.
औरंगाबाद : हडको एन-११ येथील रवीनगर आणि सुदर्शननगर येथे अंगण झाडणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन मिनीगंठण चोरट्यांनी हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी पावणेसहा ते सहा वाजेदरम्यान घडली. याविषयी सिडको ठाण्यात चोरट्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
जानेवारीपासून शहरात मंगळसूत्र चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. हडको एन-११ मधील रवीनगर येथील रहिवासी लक्ष्मी धनाजी बोराडे (६५) या शुक्रवारी सकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास अंगण झाडत होत्या.
यावेळी त्यांच्या मागून गल्लीतून आलेल्या तरुणाने अचानक त्यांच्या गळ्यातील मनीमंगळसूत्र आणि सोन्याचे गंठण हिसका देऊन तोडून घेतले. चोरट्याने अडीच तोळ्याचे मिनीगंठण आणि तीन ग्रॅमचे मंगळसूत्र यात सोन्याचे १०० मनी होते. यावेळी लक्ष्मी यांनी आरडाओरड करून चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोर तेथून पळून गेल्याने तो लक्ष्मी यांच्या हाती लागला नाही.
या घटनेनंतर अवघ्या पंधरा मिनिटांनी सुदर्शननगर येथील संजीवनी सुनील इधारे (२५) यांच्या गळ्यातील मिनीगंठण याच चोरट्याने हिसकावून नेले. संजीवनी या सकाळी ६ वाजेच्या सुमारास अंगण झाडत होत्या.
चोरट्याने संधी साधून त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण हिसका देऊन तोडून घेत पळून गेला. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस निरीक्षक अशोक गिरी आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. याविषयी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
घटना दोन, चोरटा एक
संजीवनी आणि लक्ष्मी यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावण्याच्या दोन घटनांमधील चोरटा हा एकच असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही महिलांनी दिलेल्या वर्णनानुसार मंगळसूत्र चोरट्याचे वय अंदाजे २० ते २२ वर्षे आहे. त्याची उंची साडेपाच फूट, रंग सावळा, अंगावर काळ्या बाह्याचा गुलाबी टी शर्ट त्याने घातलेला होता.
चोरटा सीसीटीव्ही कॅ मे-यात कैद
संजीवनी आणि लक्ष्मी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेणारा चोरटा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला. शिवाय त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे काही महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याचे समोर आले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.