तहसीलमधील लाचखोर लिपिक व दलालास दोन वर्षांची सक्तमजुरी
By Admin | Published: July 14, 2015 12:37 AM2015-07-14T00:37:56+5:302015-07-14T00:37:56+5:30
औरंगाबाद : तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेतील कनिष्ठ लिपिक सुभाष इरबा माने व दलाल दिलीप सखाराम देहाडे या दोघांनी लाच स्वीकारल्याचे
औरंगाबाद : तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेतील कनिष्ठ लिपिक सुभाष इरबा माने व दलाल दिलीप सखाराम देहाडे या दोघांनी लाच स्वीकारल्याचे सत्र न्यायालयात सिद्ध झाले असून, न्यायालयाने दोघांनाही दोन वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्यांचा कारावास, अशी शिक्षा ठोठावली.
देवळाई चौकात झालेल्या अपघातात रामनाथ नंदू चव्हाण (रा. भिंदोन तांडा) यांचे २८ नोव्हेंबर २००६ रोजी निधन झाले. चव्हाण कुटुंब दारिद्र्यरेषेखालील आहे. त्यामुळे रामनाथ यांच्या पत्नी हिराबाई यांनी राष्ट्रीय कुटुंब साह्य योजनेंतर्गत मदत निधीसाठी ९ जानेवारी २००७ रोजी अर्ज केला होता. हिराबाई यांचा दीर ज्ञानेश्वर चव्हाण हेच या अर्जाचा पाठपुरावा करत होते. तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सुभाष इरबा माने यांच्याकडे या योजनेतील १० हजार रुपयांचा धनादेश देण्याचा टेबल होता. ज्ञानेश्वर सतत चकरा मारत होते. दि. १६ एप्रिल २००७ रोजी सकाळी ज्ञानेश्वर तहसील कार्यालयात गेले असता, सुभाष माने याने त्यांना चहा पिण्यासाठी हॉटेलात नेले. त्याच्यासोबत दलाल दिलीप देहाडे हादेखील होता. १० हजार रुपयांचा धनादेश देण्यासाठी माने याने दीड हजार रुपयांची मागणी केली. ज्ञानेश्वर यांनी गरिबीची परिस्थिती सांगत, याचना केली. तेव्हा देहाडे म्हणाले, दीड हजार रुपये दे अन्यथा धनादेश परत जाईल व तू बस चकरा मारत. यावर ज्ञानेश्वर तयार झाला व उद्या पैसे घेऊन येतो, असे सांगून निघून गेला.
ज्ञानेश्वर याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिसांनी दि. १७ एप्रिल रोजी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ज्ञानेश्वर याने देहाडेकडे दीड हजार रुपये दिले. देहाडेकडील पैसे माने याने काढून घेत, त्यातील ५०० रुपये स्वत:कडे ठेवले व उर्वरित १००० रुपये देहाडेला परत केले. पोलीस निरीक्षक पी. डी. जाधव यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली. अतिरिक्त लोकअभियोक्ता राजेंद्र मुगदिया यांनी चार साक्षीदार तपासले.