कुलगुरुंच्या कारकीर्दीची दोन वर्षे पूर्ण

By Admin | Published: June 5, 2016 12:07 AM2016-06-05T00:07:37+5:302016-06-05T00:42:24+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कुलगुरूपदाच्या कारकीर्दीला शनिवारी दोन वर्षे पूर्ण झाली.

Two years completed by Vice Chancellor | कुलगुरुंच्या कारकीर्दीची दोन वर्षे पूर्ण

कुलगुरुंच्या कारकीर्दीची दोन वर्षे पूर्ण

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कुलगुरूपदाच्या कारकीर्दीला शनिवारी दोन वर्षे पूर्ण झाली. मात्र, या दोन वर्षांत ते शैक्षणिक दर्जाबाबत आणि विद्यार्थी हिताचे निर्णय घेण्यात यशस्वी झाले नसल्याचे चित्र आहे.
दोन वर्षांच्या कारकीर्दीत डॉ. चोपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने विद्यापीठाने मात्र वर्षभर विविध आणि उत्तम कार्यक्रम राबविले. याचे सर्व श्रेय डॉ. चोपडे यांना जाते. विद्यापीठातील संशोधन कार्यास गती देण्यासाठी डॉ. चोपडे यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्यासारखेच आहेत. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठ नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ रँकिंग फ्रेमवर्कमध्ये देशातील पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये ८४ व्या स्थानी आले. ही त्यांच्या कार्यकाळातील मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. विज्ञान विभागाचे नेमके मूल्यांकन करून त्यांनी उत्तम काम करणाऱ्या विभागांच्या निधीतही वाढ केली. विद्यापीठाला केंद्रीय दर्जा मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी प्रस्तावही मुख्यमंत्री आणि केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्र्यांकडे सादर केला आहे. काही भव्यदिव्य करावे, अशी त्यांची ऊर्मी असली तरी त्याचे नियोजन करण्यामध्ये मात्र ते अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहत नसल्याची त्यांची कमजोरी इतरांच्या समोर आल्याने त्यांच्या कामात अनेक अडथळे निर्माण झाल्याने काही वादग्रस्त प्रकरणांमुळे त्यांची चौकशीही झाली. विशेष करून बारकोड उत्तरपत्रिका घोटाळ्यामध्ये ते आणि तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेश गायकवाड यांची चौकशी झाल्यामुळे आणि हा प्रश्न विधिमंडळात चर्चिला गेल्याने विद्यापीठाची प्रतिमा मलीन झाली. शिवाय ६ कोटी रुपयांचे विनानिविदा सॉफ्टवेअर खरेदीचे प्रकरणही त्यांच्या अंगलट आले. काही बेकायदा नियुक्त्या आणि गतवर्षी व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांच्या परदेश दौऱ्यातील खर्चाबाबत कुलगुरूंनी केलेला बचाव यामुळेही कुलगुरू इतरांसमोर आदर्श ठरले नाहीत.
दरम्यान, विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी यांच्यातर्फे कुलगुरूंचा सत्कार करण्यात आला. ‘बामुटा’तर्फे अध्यक्ष डॉ.वाल्मीक सरवदे, डॉ. महेंद्र शिरसाठ व सहकारी प्राध्यापकांनी सत्कार केला. तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य मधुकर गायकवाड व नजमा शेख, रवी बनकर व सहकाऱ्यांनीही सत्कार केला. अधिकाऱ्यांतर्फे परीक्षा नियंत्रक डॉ. डी. एम. नेटके, डॉ. सूर्यकांत जगदाळे, प्रदीपकुमार जाधव, अरविंद भालेराव, स्मिता चावरे, विष्णू कऱ्हाळे व सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. ‘मुप्टा’चे प्रा. सुनील मगरे, डॉ. संभाजी वाघमारे, डॉ. सुरेश गायकवाड यांच्यासह विविध प्राध्यापक, विद्यार्थी संघटनांनीही त्यांचा सत्कार केला.

 

Web Title: Two years completed by Vice Chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.