दोन वर्षे, 70,000 किलोमीटरचा प्रवास; शहिदांच्या मृतिकेसाठी एका वेड्याचे साहस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 02:35 PM2020-11-19T14:35:58+5:302020-11-19T14:44:34+5:30
सैनिकांना घडविणारी त्यांच्या जन्मभूमीची, त्यांच्या अंगणातली माती जमा करण्याचा प्रयत्न उमेश संपूर्ण भारतात फिरून करीत आहेत.
- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : श्रीनगर ते कन्याकुमारी अन् गुजरात ते मिझोराम असा तो अवलिया झपाटल्यासारखा अखंड फिरतो आहे. उद्देश फक्त एकच भारतमातेच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या सैनिकांना घडविणाऱ्या मातीला म्हणजेच त्यांच्या जन्मभूमीला नमन करून ती माती आपल्या भाळी लावणे आणि या सर्व वीर शहिदांच्या स्मृतीतून भारतीयत्वाचा संदेश देणारे स्मारक त्या मातीतून उभारणे. औरंगाबादचे रहिवासी उमेश गोपीनाथ जाधव यांची ही अनोखी देशभक्ती रोमांचित करणारी आहे. ‘तेरी मिट्टी मे मिलजावा, गुल बन कें मै खिलजावा, इतनी सी हैं दिलकी आरजू....’ हेच स्वप्न बघत भारताचे वीर सुपुत्र प्राणपणाने लढत अखेरीस शहिद होतात. या सैनिकांना घडविणारी त्यांच्या जन्मभूमीची, त्यांच्या अंगणातली माती जमा करण्याचा प्रयत्न उमेश संपूर्ण भारतात फिरून करीत आहेत.
संगीताची आवड असलेले उमेश सध्या बंगळुरूत स्थायिक आहेत. या रोमांचकारी प्रवासाविषयी सांगताना ते म्हणाले की, पुलवामा हल्ल्याची बातमी कानावर आली. या हल्ल्यात जर माझ्या घरातील व्यक्ती शहीद झाली असती, तर मी काय केले असते, हा विचार मनात डोकावला आणि मी शहारून गेलो. या सैनिकांसाठी काहीतरी करावे, असे मनापासून वाटू लागले. यातूनच आजवर भारतासाठी लढताना विविध युद्धांत शहीद झालेल्या जवानांच्या जन्मभूमीची माती जमा करण्याचा विचार दिनेशला सुचला. भारतीय लष्कराच्या परवानगीने ९ एप्रिल २०१९ रोजी उमेश यांचा प्रवास बंगळुरू येथून सुरू झाला. तेथील सीआरपीएफचे डीआयजी सानंद कमल यांनी फ्लॅगऑफ करून उमेश यांच्या प्रवासाची सुरुवात करून दिली. ९ एप्रिल २०२० ला हा प्रवास पूर्ण होणार होता. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रवास थांबला. २१ ऑक्टोबरपासून उमेश यांनी पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. आजवर त्यांनी ७० हजार कि.मी.चा प्रवास करून ९० शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना भेट देऊन त्यांच्या घरासमोरील माती घेतली आहे. पुलवामा घटनेतील ४० शहीद जवानांच्या घरासमोरील माती त्यांनी लष्काराकडे सुपूर्तही केली आहे. आता अंदमान लक्षद्वीप, लडाख आणि हिमाचल या चार राज्यांचा प्रवास करून ९ एप्रिल २०२१ रोजी हा प्रवास पूर्ण करण्याचा उमेश यांचा मानस आहे.
वाटेत भेटणाऱ्या सामान्य लोकांकडून मिळणारी मदत आणि स्वत:जवळचे भांडवल या जोरावर उमेश यांचा प्रवास सुरू आहे. या प्रवासात उमेश सध्या पुणे येथून औरंगाबादला आले असून, ते नाशिकमार्गे सिल्वासा येथे जाणार आहेत. पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या जवानांच्या तिसऱ्या पिढीला भेटून आणि हायफा युद्धातील म्हैसूर लॅन्सर यांच्या घरी जाऊनही उमेश यांनी माती घेतली आहे. एका चारचाकी गाडीला दुसरी चारचाकी जाेडून उमेश यांचा प्रवास सुरू आहे. गाडीवर लिहिलेले देशभक्तीपर संदेश पाहूनच अनेकांच्या मनात आदरभाव दाटून येतात.
डोळ्यांत दाटले पाणी
औरंगाबाद जिल्ह्यातील गायकवाड कुटुंबात उमेश गेले असता, त्यांच्या घरात लग्नाची लगबग दिसून आली. १७ महिन्यांची असताना ज्या चिमुकलीचे वडील शहीद झाले होते, आज तिच्याच लग्नासाठी घर सजले होते. आपल्या वडिलांच्या आठवणी जागवत ऐन लग्नाच्या वेळी आलेले उमेश पाहून त्या नवरीला आणि घरातील प्रत्येकालाच भावना आवरणे कठीण झाले होते. असाच अनुभव प्रत्येक घरात येतो आणि अगदी कालच घटना घडली असावी एवढे ते लोक भावनिक होतात, असे उमेश यांनी सांगितले.