दोन युवकांना सातारा पोलीस ठाण्यात बेदम मारहाण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:04 AM2021-07-20T04:04:06+5:302021-07-20T04:04:06+5:30
औरंगाबाद : सातारा पोलीस ठाण्यात बोलावून घेत पाच पोलिसांनी दोन युवकांना खोलीमध्ये दोरीने बांधून लाठी व सुंदरीने बेदम मारहाण ...
औरंगाबाद : सातारा पोलीस ठाण्यात बोलावून घेत पाच पोलिसांनी दोन युवकांना खोलीमध्ये दोरीने बांधून लाठी व सुंदरीने बेदम मारहाण केली. चोरीच्या गुन्ह्यात अडकवून तडीपार करण्याची धमकी दिल्याची तक्रार त्या दोघांनी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्याकडे केली. ही घटना १६ जुलै रोजी दुपारी २ ते ६ च्या दरम्यान घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पैठण रोड येथील रहिवासी गणेश एकनाथ शेटे या युवकाने सोमवारी पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत अनेक गंभीर आरोप केले आहेत. पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने शेटेसह विशाल दादाराव देवकाते यास बोलावून घेतले. दोघांना एका खोलीत नेऊन पाच पोलिसांनी दोरीने बांधले. लाकडी दांडा व सुंदरीच्या पठ्ठ्याने बेदम मारहाण केली. कोर्टात जाऊन जामीन घेतो का? तुला चेन चोरीच्या गुन्हात फसवतो, अशी धमकी देत दोघांच्या हातांवर व तळपायांवर फटके लगावले. पोलीस निरीक्षक व आम्ही फोन केल्यावर पोलीस ठाण्यात का येत नाहीस, असे बोलून ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोपही तक्रारीत आहे.
चौकट,
तक्रार दिली तर तडीपार करू
आमच्या विरोधात तक्रार दिल्यास तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकू, तसेच तडीपार करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मारहाणीनंतर पोलिसांनी आम्हाला उस्मानपुरा परिसरात आणून सोडले. यानंतर दोघांनी घाटी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. घाटीच्या नोंदीत सातारा पोलीस ठाण्यात दोघांना मारहाण झाल्याचा उल्लेख केलेला आहे.
कोट,
सातारा पोलीस ठाण्यात त्यांना मारहाण झालेली नाही. त्यांच्या तक्रारीत तथ्य नाही. तक्रारदारानेच तीन चार दिवसांपूर्वी भर रस्त्यात दोघांना बेदम मारहाण केली होती. तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे.
- सुरेद्र माळाळे, पोलीस निरीक्षक, सातारा पोलीस ठाणे