बालमधुमेही वाढले; लक्षणे काय? काय काळजी घ्याल?
By संतोष हिरेमठ | Published: December 22, 2023 07:26 PM2023-12-22T19:26:25+5:302023-12-22T19:27:23+5:30
टाइप एक मधुमेह हा लहान मुलांमध्ये आढळून येणारा मधुमेह आहे.
छत्रपती संभाजीनगर : मधुमेह म्हटला की फक्त मोठ्या व्यक्तींनाच, असा समज आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत बालमधुमेहींचीही संख्या वाढू लागली आहे. मधुमेहामुळे मुलांना आरोग्यासह इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मुलांच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देऊन काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
बालमधुमेही वाढण्याची कारणे काय?
टाइप एक मधुमेह हा लहान मुलांमध्ये आढळून येणारा मधुमेह आहे. हा मधुमेह होण्याचे कोणतेही एक स्पष्ट कारण नसते. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे बालमधुमेहींना दररोज इन्सुलिन घ्यावे लागते.
बालमधुमेहींची लक्षणे काय?
खूप तहान लागणे, वारंवार लघवीला जावे लागणे, खूप भूक लागणे, वजन कमी होणे ही बालमधुमेहाचे लक्षण आहे. थकवा, सुस्त होणे ही देखील लक्षणे आहेत.
काय काळजी घ्यावी?
मुलांचे वजन, उंची वाढत नसेल, खूप तहान लागणे, वारंवार लघवीला जावे लागणे आदी लक्षणे जाणवल्यास पालकांनी दुर्लक्ष करू नये. वेळी डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. बालमधुमेहींना दररोज इन्सुलिन घ्यावे लागते. हे इन्सुलिन कोणत्याही कारणामुळे चुकविता कामा नये.
निदान वाढले
पूर्वी तपासणीचे प्रमाण कमी होते. कोणी डाॅक्टरांकडे जात नसे. मात्र, आता डाॅक्टरांकडे जाण्याचे आणि तपासणीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बालमधुमेहींची संख्या वाढलेली दिसत आहे.
- डाॅ. अर्चना सारडा, बालमधुमेहीतज्ज्ञ
इन्सुलिन घेणे चुकवू नये
इन्सुलिन चुकविता कामा नये. मुलांनी नियमितपणे ते घेतलेच पाहिजे. इन्सुलिन चुकविल्यास शुगर वाढून मुलांना उलटी, मळमळ, बेशुद्ध होणे आदी त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
- डाॅ. नीलेश लोमटे, मधुमेहतज्ज्ञ