वडगावच्या खाजगी शाळेतील प्रकार
By | Published: December 8, 2020 04:00 AM2020-12-08T04:00:01+5:302020-12-08T04:00:01+5:30
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील एका खाजगी शाळेतील जवळपास साडेचार क्विंटल पोषण आहाराचे धान्य लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज ...
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील एका खाजगी शाळेतील जवळपास साडेचार क्विंटल पोषण आहाराचे धान्य लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत येथील ज्ञानगंगा पब्लिक स्कूल या खाजगी शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तांदूळ, चवळी, मूगडाळ आदी साहित्य आले होते. आठवडाभरापूर्वी शाळेतील २५ विद्यार्थ्यांना पालकांची स्वाक्षरी घेऊन पोषण आहार वितरित करण्यात आला. कोरोनामुळे बहुतांश विद्यार्थी शाळेत येत नसल्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांचा पोषण आहार शाळेतील वर्गखोलीत ठेवण्यात आला होता. दरम्यान, ५ डिसेंबर रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला निकम व मदतनीस चंद्रकला काटे या शाळेत गेल्या असता त्यांना पोषण आहार ठेवलेल्या खोलीचे कुलूप तुटलेले दिसून आले. यावेळी पोषण आहार गायब असल्याचे दिसून येताच मुख्याध्यापिका निकम यांनी संस्थेचे सचिव योगेश पाटील व सदस्या पुष्पा अजमेरा यांना माहिती दिली. मुख्याध्यापिका निकम यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून ६ हजारांचे पोषण आहाराचे धान्य चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. या शाळेत सेवक म्हणून काम करणारा संतोष इंगळे व सुनीता फुके या दोघांनी पोषण आहार लांबविल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.