किरीट सोमय्यांविरोधात ‘आरसा पाहा’ आंदोलन; उबाठा सेना महिला आघाडीची जोरदार घोषणाबाजी
By बापू सोळुंके | Published: July 18, 2023 04:44 PM2023-07-18T16:44:53+5:302023-07-18T16:46:13+5:30
राजकीय पक्षाचा मोठा नेता एवढा किळसवाणा प्रकार कसा करतो? अशा व्यक्तींना राजकारणात राहण्याचा अधिकार नाही
छत्रपती संभाजीनगर : भाजप नेते किरीट सोमय्या यांची अश्लील क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने भाजप आणि सोमय्यांविरोधात मंगळवारी दुपारी क्रांती चौकात ‘आरसा पाहा’ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक महिलांनी किरीट सोमय्या हाय, हाय.. राज्य सरकार हाय, हाय.. आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
सोमय्यांची कथित अश्लील क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. ही क्लीप व्हायरल करून एखाद्याला राजकीय जीवनातून उठविण्याचा प्रकार असल्याची चर्चा काहीजण करत आहेत, तर राजकीय पक्षाचा मोठा नेता एवढा किळसवाणा प्रकार कसा करतो? अशा व्यक्तींना राजकारणात राहण्याचा अधिकार नाही, अशी संतप्त भावना व्यक्त करीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीने मंगळवारी क्रांती चौकात आरसा पाहा आंदोलन केले. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी साेमय्यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी करावी, या क्लिपची आणि सोमय्यांची कसून चौकशी करावी, अशी मागणी महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप यांनी केली.
आंदोलनात अनिता मंत्री, नलिनी बाहेती, सुकन्या भोसले, मीना फसाटे, सुनंदा खरात, दुर्गा भाटी, मीरा देशपांडे, छाया देवराज, अंजना गवळी, पंचशीला काळे, सुकन्या कुलकर्णी, रेखा शहा, सुनीता सोनवणे, विद्या अग्निहोत्री, आशा दातार, पद्मा तुपे, मंजूषा नागरे, संध्या जाधव, मीना थोरवे, कविता मठपती, सुषमा यादगिरे, सारिका शर्मा, संगीता दसपुते, विजया त्रिभुवन आदींनी सहभाग नोंदविला. (छायाचित्र आहे)