उद्धव की राज?; कोणत्या ठाकरेंची औरंगाबादमधील सभा मोठी?... हा घ्या ग्राउंड रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 09:00 PM2022-06-08T21:00:47+5:302022-06-08T21:08:21+5:30
राज ठाकरेंच्या एल्गारानंतर औरंगाबादेत उद्धव ठाकरेंचा हुंकार
औरंगाबाद:मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या १ मे रोजीची सभा ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाली त्याच ठिकाणी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा झाली. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सभास्थळी आगमन होणापूर्वी पासूनच एक वेगळीच चर्चा रंगली. राज ठाकरे यांच्या सभेपेक्षा आज जास्त गर्दी आहे की कमी ? सभास्थळी आणि बाहेरही शिवसैनिक, विरोधाकांसह नागरिकही सभेच्या गर्दीचा अंदाज घेण्यात व्यस्त होते.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगा हटाव मोहीम हाती घेतल्यानंतर मुंबई, ठाणेनंतर औरंगाबाद येथे सभा घेतली. १ मे रोजी झालेल्या या सभेस परवानगी मिळण्यापासून मोठ्या नाटकीय घडामोडी घडल्या होती. राज ठाकरे यांच्या सभेला अटीशर्थीवर परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज यांची सभा झाली. हे मैदान पूर्ण भरले होते. तसेच मैदानाच्या बाहेरही अनेक जण उभे असल्याचे चित्र होते. येथे जवळपास ३५ हजार ते ४० हजार जण उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार टीका केली होती. दरम्यान, शिवसेनेच्या मराठवाड्यातील शाखेच्या ८ जून रोजीच्या वर्धापन दिनी मुख्यमंत्र्यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरच सभा होणार अशी घोषणा शिवसेनेने केली.
शिवसेनेची सभा मैदानाबाहेर शहरात तीन ठिकाणी मोठ्या पडद्यावर लाईव्ह
त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा राज यांची सभा झाली त्याच मैदानावर आयोजित करण्यात आली. मैदान खचाखच भरून अनेक शिवसैनिक बाहेर उभे होते. तर शहरातील तीन ठिकाणी मोठे पडदे लावून सभा लाईव्ह दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सभा स्थळी येऊ न शकणारे शिवसैनिक आणि नागरिकांसाठी शहरातील खडकेश्वर, मल्टीपर्पज हायस्कूल आणि कर्णपुरा येथे मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. सभेसाठी आलेल्या काही जुन्या शिवसैनिकांच्या मते आजच्या सभेसाठी मैदानात ५० हजारांपेक्षा अधिक शिवसैनिक होते. तर या विक्रमी गर्दीसोबतच शहरातील तीन ठिकाणी लावलेल्या पडद्यावर देखील हजारो शिवसैनिक, नागरिकांनी सभा पाहिली. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी देखील आपल्या भाषणात शिवसैनिकांनी आज स्वतःचाच विक्रम मोडला असल्याचे म्हटले.