उद्धवसेनेची निवडणुकीआधीच नामुष्की; किशनचंद तनवाणींची माघार कोणाच्या पथ्यावर?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 12:40 PM2024-10-29T12:40:08+5:302024-10-29T12:43:01+5:30
औरंगाबाद मध्य मतदारसंघात राजकीय भूकंप; जैस्वाल, सिद्दीकींचा मार्ग मोकळा होणार का?
- मुजीब देवणीकर
छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास राजकीय भूकंप पाहायला मिळाला. उद्धवसेनेचे अधिकृत उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली. त्यामुळे ही राजकीय खेळी कोणाला फायदेशीर ठरणार यावर तर्कवितर्क सुरू झाले. तनवाणी यांची माघार शिंदेसेनेचे प्रदीप जैस्वाल, एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांचा मार्ग मोकळा करणारी ठरेल का? बदललेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता एमआयएम मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणाला आणखी एखादा मास्टर स्ट्रोक खेळेल का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
तनवाणी यांनी २०१४ मध्ये भाजपाकडून मध्य मतदारसंघात नशीब अजमावले होते. त्यांच्यासमोर शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल होते. दोघांच्या मतविभाजनाचा फायदा एमआयएमचे इम्तियाज जलील यांना झाला होता. मध्य मतदारसंघात यंदाही २०१४ सारखीच परिस्थिती निर्माण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २४ ऑक्टोबरला प्रसिद्ध केले होते. उद्धवसेना आणि शिंदेसेनेत मतविभाजन होणार हे अटळ आहे. आता उद्धवसेनेने पर्यायी उमेदवार दिला. जैस्वाल यांच्यासमोर उद्धवसेनेची मशाल किती प्रकाश पाडेल हे २० ऑक्टोबरला कळेल. या मतदारसंघात ३ लाख ६६ हजार मतदान आहे. त्यात महिलांची संख्या १ लाख ७८ हजार तर पुरुष मतदारांची संख्या १ लाख ८७ हजार आहे. शिंदेसेनेकडे काही प्रमाणात लाडकी बहीण आहे. उद्धवसेनेकडे काय? मतदारांना दाखविण्यासाठी विकास कामेही नाहीत.
एमआयएम पक्षाला उकळ्या...
‘मध्य’मधील बदलेल्या राजकीय परिस्थितीमुळे एमआयएम पक्षाला मात्र, उकळ्या फुटत आहेत. आपला मार्ग आणखी सोपा झाला, असे त्यांना आज तरी वाटू लागले. या मतदारसंघात ३५ टक्यांहून अधिक मुस्लीम मते आहेत. या ठिकाणी वंचित फॅक्टर वगळता मत विभाजनाचा फारसा धोकाही नाही. एमआयएमने अगोदरच येथे नासेर सिद्दीकी यांना निवडणूक रिंगणात उतरवून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिलेला आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत एमआयएम या मतदारसंघात आणखी एखादा मास्टर स्ट्रोक तर खेळणार नाही ना... अशी शक्यता वर्तविली जात आहे.