उद्धव ठाकरेंनी मागितली औरंगाबादकरांची माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 06:31 PM2018-04-19T18:31:40+5:302018-04-19T19:58:47+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कचरा प्रश्नी औरंगाबादकरांची माफी मागितली आहे.
औरंगाबाद - शहरातील ६३ दिवसांपासून झालेली कचराकोंडी येत्या आठ दिवसांत फुटेल. परंतु महापालिकेला कचरा कोंडी फोडण्यात अपयश आले आहे. औरंगाबादकरांनी शिवसेनेवर टाकलेल्या विश्वासाला तडा गेल्यामुळे त्यांची पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गुरूवारी जाहीर माफी मागितली. ते सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे दोन दिवस मराठवाडा दौऱ्यावर असून ते संघटनात्मक पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेत आहेत.
ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या बैठकीपूर्वी महापौर नंदकुमार घोडेले, खा.चंद्रकांत खैरे, पालकमंत्री डॉ.दीपक सावंत, पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि मनपा अधिकाऱ्यांचीबैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, कचऱ्याची समस्या बिकट झाली असून त्याला गती नाही. औरंगाबादवासियांची दिलगिरी मागतो. हे काम शासन, प्रशासनाचे आहे. औरंगाबादकरांनी आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे, त्यामुळे त्यांची क्षमा मागतो. आज जी चर्चा झाली आहे, त्यानुसार मनपा अधिकाऱ्यांनी ८ ते १० दिवसांत कचराकोंडी सुटेल, असे आश्वासन दिले आहे. या विषयात राजकारण आणू इच्छित नाही. शहराला मनपा आयुक्त नाही. पोलीस आयुक्त प्रभारी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांची बदली केली. या सगळ्या बाबींमध्ये मार्ग काढणे सुरू आहे. नागरिकांंना त्रास होतो आहे, नागरिकांची पुन्हा एकदा क्षमा मागतो. शहराची कचराकोंडी लवकरच फुटेल. कचरा टाकण्यासाठी जेथे पालिका गेली तेथे विरोध झाला. सर्वांनी सहकार्य करावे.
कचरा कोंडी सोडविण्यात स्थानिक नेतृत्व अपयशी ठरले .आहे काय? यावर ठाकरे म्हणाले, नाही नेतृत्व अपयशी ठरले नाही. परंतु सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे, यंत्रणा काम करीत असतांना शासनाकडून मनपा आयुक्त नाही. पूर्ण वेळ पोलीस आयुक्त नाहीत. जिल्हाधिकारी रुजू झालेले नाहीत. मग काम कसे करणार. परंतु ६२ दिवसांत कचरामुक्ती का झाली नाही. यावर ठाकरे म्हणाले, जनता सध्या कचरामुक्ती मागते आहे. सरकारने देखील इतरत्र जागा उपब्ध करून दिली पाहिजे. यंत्रणा, मशिनरी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था शासनाने केली पाहिजे. भाजपने कोंडी केली आहे काय, यावर राजकारण करू इच्छित नसल्याचे ठाकरे म्हणाले. सरकार आणि प्रशासनाने एकत्रित काम करावे.