ठाकरे गट अन् भाजपा कार्यकर्ते भिडले; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात मोठा राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 11:05 AM2024-08-26T11:05:20+5:302024-08-26T11:41:23+5:30

महिला अत्याचाराच्या प्रकरणावरून राज्यात राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात अंबादास दानवेंनी केलेल्या आंदोलनानंतर आज भाजपानं आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात आंदोलन केले. 

Uddhav Thackeray group and BJP activists clashed at Chhatrapati Sambhajinagar when Aditya Thackeray tour | ठाकरे गट अन् भाजपा कार्यकर्ते भिडले; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात मोठा राडा

ठाकरे गट अन् भाजपा कार्यकर्ते भिडले; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात मोठा राडा

छत्रपती संभाजीनगर - शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. आदित्य ठाकरेंना विरोध करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते त्यांच्या हॉटेलबाहेर जमले होते. त्यावेळी घोषणाबाजी करताना ठाकरे गट आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी हाणामारीही झाली. 

पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते, त्यामुळे आज आदित्य ठाकरे ज्या रामा हॉटेलमध्ये थांबले होते. तिथे भाजपा कार्यकर्ते विरोध करण्यासाठी पोहचले होते. तिथे जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने उत्तर दिले. त्यानंतर दोन्ही कार्यकर्ते एकमेकांसमोर आले आणि मोठा राडा बघायला मिळाला. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली तेव्हा कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. यावेळी फक्त आमच्याच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला असा आरोप अंबादास दानवेंनी केला. तर भाजपा आंदोलकांनी आक्रमक होत आम्ही दिशा सालियन प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी गेलो होतो अशी प्रतिक्रिया दिली.

यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, आदित्य ठाकरे संघटनात्मक दौऱ्यावर आलेले आहेत. आंदोलन करण्याचा सर्वांनाच अधिकार, परंतु कुणाच्या घरासमोर, हॉटेलसमोर आंदोलन करायचे नसते. भाजपा व्यक्तिगत हेतूने आंदोलन करत होते. शिवसैनिकांना राग आला. शिवसैनिकांनी जे करायचे ते केले. पोलीस आणि भाजपा एकत्रित येऊनही आमच्या अंगावर आले तरी शिवसैनिक पुरून उरतील. आमचे आंदोलन देशातील महिलांच्या सुरक्षेविषयी होते. आमचे आंदोलन मोदींविरोधात नव्हते. आम्ही घोषणाबाजी केली नाही. काळी फिती लावून आंदोलन केले. संजय राठोड, राहुल शेवाळे यांचीही प्रकरणे आहेत ना, बदलापूर प्रकरणी पोलिसांनी दडपशाही केले. पोलिसांच्या काठीने आम्ही घाबरत नाही. पोलीस पक्षपातीपणे वागतायेत. आंदोलन करायचे होते तर क्रांती चौकात करायचे होते असं त्यांनी सांगितले. 

राड्यानंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले?

दरम्यान, माझ्याविरोधात जे आंदोलन केले ते मोदींविरोधात आम्ही आंदोलन केले त्यासाठी केले. आम्ही महिलांच्या अत्याचाराविरोधात आंदोलन केले. आम्ही शक्ती कायदा आणला, महाराष्ट्रात सत्ता कोणाची आहे? पोलिसांवर हल्ले होतायेत. बदलापूर प्रकरणी नागरिक रस्त्यावर येतात, त्यांना तुम्ही राजकीय बोलता, पण पीडित कुटुंबाची तक्रार घ्यायला १२ तास का लागले? आम्ही पक्षाविरोधात नाही तर विकृतीविरोधात आंदोलन केले. ज्यांना भाजपा घाबरते, त्याला बदनाम करण्याचं राजकारण भाजपा करतं असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. 

लोकसभेतील धक्क्यानंतर, ३ पक्ष आणि महायुती सरकारने उचललेल्या पावलांमुळे वातावरण फिरतंय किंवा फिरेल, असं वाटतं का?

हो, महायुतीला फायदा होऊ शकतो (345 votes)
नाही, वातावरण फिरताना दिसत नाही (505 votes)

Total Votes: 850

VOTEBack to voteView Results

Web Title: Uddhav Thackeray group and BJP activists clashed at Chhatrapati Sambhajinagar when Aditya Thackeray tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.