"रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू योग्य जागा असल्याचे उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना पाठवले होते पत्र"
By बापू सोळुंके | Published: April 25, 2023 07:59 PM2023-04-25T19:59:14+5:302023-04-25T19:59:34+5:30
रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पामुळे सुमारे एक ते दिड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. राज्याचा जीडीपी साडेआठ टक्क्यांनी वाढणार आहे.
छत्रपती संभाजी नगर: मुख्यमंत्रीपदी असताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प राज्यासाठी खूप महत्वाचा असल्याचे आणि बारसू येथेच या प्रकल्पासाठी योग्य जागा असल्याचे नमूद केले होते, असा खळबळजनक खुलासा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी येथे केला. मात्र, आता ते विरोध करत आहेत, अशा नकारात्मक प्रवृत्तीला उद्योजकांनी मोडीत काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
चिकलठाणा, शेंद्रा एमआयडीसीतील ७० कोटी रुपयांच्या अंतर्गत रस्त्याच्या विकास कामाचे भूमीपूजन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मंगळवारी येथे झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयोमंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, मसिआ संघटनेचे अध्यक्ष किरण जगताप, माजी उपमहापौर राजू शिंदे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी चेतनकुमार गिरासे, मुख्य अभियंता राजेंद्र केंद्रे, कार्यकारी अभियंता रमेश गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना उद्योगमंत्री म्हणाले की, राज्यातून उद्योग बाहेर गेले की, पत्रकार परिषदा घेऊन आरोप करणाऱ्यांनी आता हा हा प्रकल्प होऊ नये, म्हणून विरोध सुरू केला. रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पामुळे सुमारे एक ते दिड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. राज्याचा जीडीपी साडेआठ टक्क्यांनी वाढणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी कसा आवश्यक आणि महत्वाचा आहे, याविषयी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना पंतप्रधांनाना पत्र लिहीले होते. आता तेच राजकारणासाठी या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. ही नकारात्मक प्रवृती मोडीत काढण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सामंत यांनी केले. यावेळी पालकमंत्री भुमरे यांनी मनोगत व्यक्त करताना एवढ्या वेगाने काम करणारा उद्योगमंत्री आतापर्यंत पाहिला नसल्याचे नमूद करीत सामंत यांचे कौतुक केले. मंत्री सावे, मसिआचे जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.
पुढील २५ वर्ष रस्ते टिकले पाहिजे
सहा महिन्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे आलो होतो,तेव्हा रस्त्याच्या विकासासाठी मसिआ संघटनेने ४० कोटी रुपयांची मागणी केली होती. उदय सामंत यांच्या कार्यकाळात ही रस्ते झाले हे लोकांच्या लक्षात राहण्यासाठी ही रस्ते २५ वर्ष टिकतील अशी मजबूत बांधा,असे निर्देश त्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले. हे काम चांगले करून घेण्याची जबाबदारी मसिआची आहे. यात कुठेही निकृष्ट दर्जा दिसल्यास तात्काळ आपल्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी उद्योजकांना सांगितले.