Uddhav Thackeray: कट्टर शिवसैनिक... उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून 7 कोटी वेळा लिहिलं 'राम-राम'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 02:28 PM2022-06-08T14:28:45+5:302022-06-08T14:29:20+5:30
एका पुस्तकात 12 हजार 500 वेळा, अशा तब्बल 5 हजार 500 वह्यांचा गठ्ठा घेऊन हा शिवसैनिक अंकुश वाहक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आला आहे.
औरंगाबाद - आपल्या नेत्यावर आणि पक्षावर प्रेम करणाऱ्या लोकांचेही हटके अंदाज असतात. कुणी अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी सोलापूर ते दिल्ली सायकलवारी करतं. तर, कुणी नेता आमदार-खासदार होत नाही, तोपर्यंत चप्पल न घालण्याचा प्रण करतं. आता, असाच एक कट्टर शिवसैनिक औरंगाबादला मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्या सभेला ऐकण्यासाठी, त्यांची भेट घेण्यासाठी आला आहे. या शिवसैनिकाने उद्धव ठाकरेमुख्यमंत्री व्हावेत म्हणून तब्बल 7 कोटी वेळा श्रीराम-राम असं लिखाण केलं आहे.
एका पुस्तकात 12 हजार 500 वेळा, अशा तब्बल 5 हजार 500 वह्यांचा गठ्ठा घेऊन हा शिवसैनिक अंकुश वाहक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आला आहे. औरंगाबाद शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी हा शिवसैनिक मुख्यमंत्र्यांच्या खास भेटीसाठी आला असून एखादा कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी काय ते दिव्य करू शकतो याचे उदाहरणच त्याने राजकीय वर्तुळात ठेवले आहे.
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी चक्क 7 कोटी वेळा राम राम लिहिणारा हा शिवसैनिक आहे. अंकुश वाहक यांनी 2012 पासून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत, या हेतूने काही वह्यांमध्ये राम राम लिहिण्यास सुरुवात केली होती. एका वहीमध्ये बारा हजार पाचशे वेळा, राम राम लिहिणाऱ्या शिवसैनिकाने 5,500 वह्यांमध्ये हे लिखाण केले आहे. विशेष म्हणजे सदरील लिखाण केलेल्या या वही तो आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट देण्यासाठी औरंगाबाद शहरातील मराठवाडा संस्कृतिक मैदानात आला आहे.
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी मी देवाला साकडे घातले होते. जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत, तोपर्यंत मी राम-राम लिहित राहील, असा प्रण आपण केल्याचं अंकुश यांनी माध्यमांना सांगितले. तसेच, आता उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे, आतापर्यंत लिहिलेल्या 5,500 वह्या मी त्यांना भेट देणार आहे. यासाठी त्यांनी आमदार अंबादास दानवे यांच्याशी चर्चा केली असून आमदार अंबादास दानवे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना शिवसैनिकाची ही भेट देण्यात येईल, असेही ते म्हणाले.