मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्धव ठाकरे उद्घाटक; अशोक चव्हाण, पंकजा मुंडेचाही सहभाग
By बापू सोळुंके | Published: November 28, 2022 02:45 PM2022-11-28T14:45:54+5:302022-11-28T14:48:12+5:30
घनसावंगी येथे १०, ११ डिसेंबर रोजी आयोजन
औरंगाबाद : मराठवाडासाहित्य परिषदेचे (मसाप) ४२ वे मराठवाडासाहित्य संमेलन घनसावंगी (जि. जालना) येथे १० आणि ११ डिसेंबरला होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून, साहित्यिक शेषराव मोहिते हे अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आ. शिवाजीराव चोथे आणि मसापचे अध्यक्ष काैतिकराव ठाले-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ठाले-पाटील यांनी सांगितले की, आ. चोथे यांच्या रामानंदतीर्थ शिक्षण प्रसारक मंडळाने घनसावंगी येथे हे संमेलन भरविण्यासाठी मसापला निमंत्रित केले होते. जालना जिल्ह्यातील आद्य कवयित्री महदंबा यांचे नाव संमेलनस्थळाला देण्यात आले आहे. १० रोजी सकाळी १०.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होईल. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे, माजी मंत्री बबनराव लोणीकर, आ. राजेश टोपे, कैलास गोरंट्याल, माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपस्थिती असेल.
माजी संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होईल. दुपारी अडीच ते पावणेपाच या वेळेत कथाकथन होईल. पावणेपाच वाजता ‘नवलेखकांचे लेखन समाजमाध्यमांच्या आवर्तात अडकले का?’ आणि मी का लिहितो? ‘कृषी जीवनातील प्रक्षोभ आणि मराठी लेखक’ तसेच ‘संत साहित्याची उपेक्षा समाज चारित्र्यासाठी हानिकारक आहे का’ या विषयांवर परिसंवाद होतील. सायंकाळी ७ वाजता जयराम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. दुसऱ्या दिवशी ११ डिसेंबरला ज्येष्ठ लेखिका रेखा बैजल यांची प्रकट मुलाखत होईल. त्यानंतर बालमेळावा, बालकुमार लेखकांशी गप्पा, कविसंमेलन आणि ‘वर्तमान स्थितीतील प्रसारमाध्यमांकडून अपेक्षा’ या विषयावर पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. पत्रकार परिषदेला मसापचे कार्यवाह डॉ. दादा गाेरे, प्रकाशक कुंडलिक अतकरे आणि साहित्यिक डॉ. रामचंद्र काळुंखे उपस्थित होते.
अशोक चव्हाण, पंकजा मुंडे यांचाही सहभाग
मराठवाड्यातील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी संमेलनात चर्चासत्र होईल. मराठवाड्यातील सिंचन स्थिती यावर माजी मंत्री पंकजा मुंडे यांना, तर अमृतमहोत्सवी वर्षापर्यंत मराठवाड्याला काय मिळाले, या विषयावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत चर्चासत्र आयोजित होईल.