"शक्तिशाली पंतप्रधान असताना जनआक्रोश का करावा लागतोय?"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2023 06:31 AM2023-04-03T06:31:00+5:302023-04-03T06:31:40+5:30
महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरेंचा सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: राज्यभर सध्या हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत; पण जगातील सर्वांत शक्तिशाली नेता पंतप्रधानपदी असताना हिंदूंना जनआक्रोश का करावा लगतोय, असा सवाल शिवसेना (ठाकरे गट) नेते उद्धव ठाकरे यांनी केला. येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर रविवारी महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ जाहीर सभा झाली.
सभेला प्रचंड गर्दी जमली होती. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, धनंजय मुंडे, अमित देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदी नेते उपस्थित होते.
कोंबड्या झुंजविण्याचे उद्योग सध्या सुरू
- मविआच्या नेत्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टीकेचे लक्ष्य बनविले. ठाकरे म्हणाले, सध्या कोंबड्या झुंजविण्याचे उद्योग सुरू आहेत.
- निवडणुका आल्याने जातीय तेढ निर्माण केली जात आहे. हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले जाताहेत, सावरकरांच्या नावे यात्रा काढली जातेय.
- सावरकरांबद्दल आम्हाला आदर आहेच; पण तुम्हाला खरेच प्रेम असेल तर सावरकरांना भारतरत्न देण्याची हिंमत दाखवा, असे आव्हान ठाकरे यांनी दिले.
न्यायव्यवस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न
न्यायमूर्तींच्या नेमणुकीवरून केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्ट वादाचा संदर्भ देऊन ठाकरे म्हणाले, न्यायव्यवस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न होतोय; पण असाच प्रयत्न इस्रायलमध्ये झाला तर तिथली जनता रस्त्यावर उतरली. भारतातदेखील ते होईल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
मेघालयात तुम्ही काय केले?
आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन हिंदुत्व सोडले असा आरोप केला जातो. मग काश्मिरात मुफ्ती मोहम्मद, बिहारात नितीश कुमार, मेघालयात संगमा यांच्यासोबत जाऊन तुम्ही काय केले, असा सवाल ठाकरे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी मागितली म्हणून दंड आकारला जातो, यावरही त्यांनी टीका केली.
शिवरायांचा अवमान झाला, तेव्हा कुठे होता?
सावरकरांचा अपमान झाला म्हणून सध्या गौरव यात्रा काढली जातेय; पण जेव्हा तत्कालीन राज्यपालांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला तेव्हा का मूग गिळून बसला होतात, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला केला. ७५ हजार बेरोजगारांना नोकरी देणार होतात, त्याचे काय झाले? अतिवृष्टी, अवकाळीचे पैसे मिळत नाही. राज्यातील शेतकरी नाडला जातोय, कांद्याला भाव मिळत नाही. अशा शेतकरीविरोधी सरकारला जागा दाखवा, असे आवाहन त्यांनी केले.
हा तर स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान : चव्हाण
मराठवाडा मुक्तिसंग्रमाचे हे अ मृत वर्ष आहे. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार विधिमंडळात स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव करणारा ठराव करू शकले नाही. हा स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केली.
राहुल गांधींना का घाबरता?
अदानीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले म्हणून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली, त्यांना बेघर करण्यात आले. सरकार त्यांना एवढे का घाबरते, असा सवाल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. विरोधकांची ही वज्रमूठ कायम राहणार असून, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांच्या विरोधातील सरकारला पायउतार करा, असे आवाहन त्यांनी केले.