पदवीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा, म्हणाले, "मग या पदवीचा वापर काय..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 08:51 PM2023-04-02T20:51:02+5:302023-04-02T20:52:54+5:30
Narendra Modi: पंतप्रधान मोदींच्या पदवीच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे घणाघाती टीका केली. आपले पंतप्रधान ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या कॉलेजला का वाटू नये. हा कोणता न्याय आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी पाहायला मिळावी, यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल कोर्टाने २५ हजार रुपये दंड ठोठावला होता. आज पंतप्रधान मोदींच्या पदवीच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे घणाघाती टीका केली. आपले पंतप्रधान ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या कॉलेजला का वाटू नये. हा कोणता न्याय आहे. पदवी मागितली तर पदवी दाखवायची नाही. दाखवणार नाही म्हणायचं आणि पदवीबाबत विचारलं तर २५ हजार रुपये दंड. मग या पदवीचा वापर दंड वसूल करण्यासाठी करताय की काय असा टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आज देशभरात लाखो युवक सुशिक्षित, पदवीधर आहेत. अनेकांची परिस्थिती शिक्षण पूर्ण करण्यासारखी नाही. त्यातील अनेकांनी पदवी मिळवलेली आहे. हो मिळवलेली आहे कारण हल्ली डॉक्टरेटसुद्धा विकत घेता येते, असे म्हणतात. अनेकजण असे आहेत ज्यांना पदव्या दाखवून दाखवून देखील किंमत मिळत नाही. पदवीधर आहे म्हणूनही कुणी किंमत देत नाही. पदवीधर आहे, असं सांगितल्यावर पदवी घेऊन घरी जा आणि भिंतीवर चिकटवा, असं सांगितलं जातं. एकाबाजूला पदवी दाखवून किंमत मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांची पदवी दाखवलायला मागितली तर २५ हजार रुपये दंड होतो. अशी कोणती पदवी आहे त्यांच्याकडे? कोणत्या कॉलेजची आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
आमच्या कॉलेजमध्ये शिकलेला विद्यार्थी देशाच्या पंतप्रधानपदी पोहोचला आहे. असा अभिमान त्या कॉलेजला वाटला पाहिजे. आज या व्यासपीठावर मी आहे, जयंतराव पाटील आहेत. आम्ही दोघेही एकाच शाळेचे विद्यार्थी. आपलं मंत्रिमंडळ जेव्हा आलं. शाळेने मोठ्या अभिमानाने आम्हाला बोलावलं. आपल्या शाळेतील विद्यार्थी राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री झाले याचा मोठा अभिमान या शाळेला वाटला. असा अभिमान आपले पंतप्रधान ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या कॉलेजला का वाटू नये. हा कोणता न्याय आहे. पदवी मागितली तर पदवी दाखवायची नाही. दाखवणार नाही आणि विचारलं तर २५ हजार रुपये दंड. मग या पदवीचा वापर दंड भरण्यासाठी करताय की काय, असा टोला त्यांनी लगावला.