Uddhav Thackeray: लवंगीच्या फुसक्या माळा, कुठलिही ठोस भूमिका नाही; सभेनंतर मनसेनं साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 09:17 AM2022-06-09T09:17:39+5:302022-06-09T09:19:54+5:30
औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात मोठ्या गर्दीत उद्धव ठाकरेंची स्वाभिमान सभा झाली
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत भाजपवर निशाणा साधला. भाजपकडून सातत्याने होणाऱ्या टिकेला उत्तर देताना, आमचं हिंदुत्व हे मनात राम आणि हाताला काम देणारं असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, भाजपकडून सुपारी देऊन भोंगा वाजवला जात असल्याची टिकाही त्यांनी केली. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर मनसेच्या नेत्यांनी टिका करायला सुरुवात केली आहे. सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन पुन्हा एकदा ही लवंगीची फुसकी माळ निघाल्याचं म्हटलं आहे.
औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात मोठ्या गर्दीत उद्धव ठाकरेंची स्वाभिमान सभा झाली. या सभेत त्यांनी हिंदुत्त्व, औरंगाबादचा पाणी प्रश्न आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या वादावर भाष्य केलं. भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे आज देशावर नामुष्कीची वेळ आली. बेताल वक्तव्य करणाऱ्या या प्रवक्त्यामुळे देश माफी मागणार नाही. कारण, भाजपचा प्रवक्ता हा देशाचा प्रवक्ता नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी, मनसेसह, राणा दाम्पत्यावरही त्यांनी नाव न घेता टिका केली. आता मनसेकडून या टिकेला आणि एकंदरीत सभेवर भाष्य करण्यात आलं आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन निशाणा साधला. ना पाणी प्रश्नावर ठोस भूमिका, ना हिंदुत्वावर, ना शहराच्या नामांतरणावर, ना हुंकार, फक्त लावंगीच्या फुसक्या माळा, असे म्हणत देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच नाव न घेता टिका केली.
ना पाणी प्रश्नावर ठोस भूमिका, ना हिंदुत्वावर, ना शहराच्या नामांतरणावर,ना हुंकार फक्त लावंगीच्या फुसक्या माळा.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 9, 2022
उद्धव ठाकरेंच्या या सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. नामांतराच्या मुद्द्यावरुन केंद्रस्थानी असलेल्या या सभेला मोठी गर्दी होती. तर, शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी उपस्थिती होती. या सभेत तेजस ठाकरेही भगवं उपरणं गळ्यात घालून दिसले. उद्धव ठाकरेंच्या सभेनिमित्त शिवसेनेनं मोठ्या ताकदीने शक्तिप्रदर्शन केल्याचं दिसून आलं. खासदार संजय राऊत, मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे, नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.