"युती झाली नाही तर उद्धव ठाकरे यांनाही ‘ईडी’त अडकवतील!"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 05:47 PM2019-08-26T17:47:14+5:302019-08-26T22:14:44+5:30
‘ना वंशाचा, ना रक्ताचा, ना घराण्याचा... पाहिजे फक्त बाबासाहेबांच्या विचारांचा’
औरंगाबाद : भाजप-शिवसेनेची युती होणारच आहे. युती झाली नाही तर उद्धव ठाकरे यांना भाजप ईडीत अडकवेल, असा उपरोधिक टोला आज येथे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला. दुपारी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. ‘ना वंशाचा, ना रक्ताचा, ना घराण्याचा... पाहिजे फक्त बाबासाहेबांच्या विचारांचा’ हे ब्रीद घेऊन आता आम्ही समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे भीमराज्य आणण्यासाठी रिपब्लिकन ब्रदरहूड निर्माण करण्यासाठी रिपब्लिकन जनशक्ती महाआघाडी निर्माण करीत आहोत. त्याचा पहिला मेळावा उद्या, दि. २६ आॅगस्ट रोजी नाशिकला होत असल्याची माहिती त्यांनी दिली. या मेळाव्यास रिपब्लिकन पक्षाचे सर्व घटक, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक सदस्य लक्षमण माने, गंगाधर गाडे, सूर्यकांता गाडे, रमेश गायकवाड, उपेंद्र शेंडे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
‘सेव्ह मेरिट... सेव्ह नेशन’ या मोहिमेचे बोलविते धनी डॉ. मोहन भागवत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गनिमी काव्याचा वापर करून ही मोहीम सुरू केली आहे. त्यांना संविधानाची आणि आरक्षणाची समीक्षा हवी असेल तर मग आमचे उत्तर हे आहे की, आधी तुमच्या धर्मव्यवस्थेची समीक्षा करा, ब्राह्मणवादी व्यवस्थेची समीक्षा करा. माणुसकीहीन धर्मव्यवस्थेतूनच आरक्षण आले ना? धर्मव्यवस्थेची चिकित्सा करून आरक्षणाला हात लावा. अलीकडेच मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला तर हा विरोध नाही ना? आरक्षित वर्गाला अस्वस्थ करून ठेवलेकी तो विकासापासून दूर जाईल, असे हे षड्यंत्र दिसते.
‘मंदिर आरक्षण हटाव... देश बचाव’ असा नारा देत कवाडे यांनी सांगितले की, देशभरातील मंदिरांमध्येही सवर्णांमधील ओबीसी व बहुजनांनाही पुजारीपणाचे आरक्षण मिळाले पाहिजे. आता या मागणीसाठी लवकरच आंदोलन सुरू होणार आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर घणाघाती टीका केली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीअंताचे स्वप्न पाहिले होते. जातीय समीकरणाचे राजकारण करून त्यालाच बाळासाहेब छेद देत आहेत. पत्रपरिषदेस चरणदास इंगोले, अनिल तुरुकमारे, अशोक जाधव, लक्ष्मण कांबळे, राहुल पडघन, प्रकाश जाधव, सागर कुलकर्णी, आनंद लोखंडे, रामदास लोखंडे आदींची उपस्थिती होती.
वंचित आघाडीचे स्वागत
वंचित बहुजन आघाडी काँग्रेसबरोबर येत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करू; पण स्वत: मुख्यमंत्रीपदाची इच्छा बाळासाहेब आंबेडकरांनी व्यक्त करण्यापेक्षा काँग्रेसने असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरले असते, असा टोला त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना मारला.