शिवसंकल्प मेळाव्यातून उद्धव ठाकरे फुंकणार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग: अंबादास दानवे
By बापू सोळुंके | Published: July 6, 2024 07:54 PM2024-07-06T19:54:41+5:302024-07-06T20:01:21+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा जागा आमच्या हक्काच्या असल्याचे आ.दानवे म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर: औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत दारून पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा रविवारी शहरात शिवसंकल्प मेळावा होत आहे. या मेळाव्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडुणकीचे रणशिंग फुंकणार असल्याची माहिती विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
आ. दानवे म्हणाले की, सकाळी ११ वाजता बायपासवरील सूर्या लॉन्स येथे तीन सत्रात शिवसंकल्प मेळावा होईल. मेळाव्याला सुमारे पाच हजार शिवसेनेचे सरपंच,पदाधिकारी आणि शाखाप्रमुख यांना निमंत्रित करण्यात आले आहे. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत नैराश्य आले आहे. हे नैराश्य दूर करण्यासाठी हा मेळावा आहे. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. शिवसेनेने राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघाचा आम्ही आढावा घेतला आहे. इच्छुकांची माहिती पक्षांतर्गत यंत्रणेमार्फत तयार करून पक्षप्रमुखांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यादीतील उमेदवारांची चाळणी सुरू असल्याचे ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा जागा आमच्या हक्काच्या असल्याचे आ.दानवे म्हणाले. असे असले तरी जिल्ह्यातील सर्व ९ विधानसभा मतदारसंघ लढण्याची तयारी असल्याचे आ. दानवे म्हणाले. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात आम्हाला गतवर्षीपेक्षा जास्त जागा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला पक्षाचे पदाधिकारी अशोक पटवर्धन, महानगरप्रमुख राजू वैद्य, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे आणि संतोष जेजुरकर यांची उपस्थिती होती.
उद्या काही जणांचे पक्षप्रवेश मात्र...
शिवसंकल्प मेळाव्यात अपेक्षित पक्षप्रवेश होणार नसल्याचे आ. दानवे म्हणाले. मात्र अन्य काही महत्वाचे पक्षप्रवेश उद्या रविवारी होईल असे ते म्हणाले. उद्धवसेनेलाही पक्षाचे पदाधिकारी सोडचिठ्ठी देत आहेत, याकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले की, महिला आघाडीच्या पदाधिकारी गेल्या मात्र त्यांची दखल घेण्यासारखे नाही. आता आणखी कोणी पक्ष सोडतील असे वाटत नाही.