हिंदू जनआक्रोष मोर्चावरून उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी आणि भाजपावर घणाघात, खोचक टोला लगावत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 08:23 PM2023-04-02T20:23:41+5:302023-04-02T20:24:26+5:30
Uddhav Thackeray Criticize Prime Minister Narendra Modi: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर घणाघाती टीका केली.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर घणाघाती टीका केली. जगातला सर्वात शक्तिमान नेता हिंदू नेता या देशाचा पंतप्रधान झाल्यानंतरही हिंदूनां आक्रोष करावा लागतोय, त्या नेत्याची शक्ती काय कामाची, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा आज छत्रतपी संभाजीनगरमध्ये झाली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या राज्यामध्ये सावरकर गौरव यात्रा निघाली आहे. तत्पूर्वी हिंदू जनआक्रोष मोर्चे निघाले होते. तुमच्याकडेही मोर्चा निघाला होता ना. मुंबईत निघाला होता. कुठून निघाला होता, माहिती नाही. मात्र तो शिवसेना भवनासमोर आला होता. जगातला सर्वात शक्तिमान नेता, हिंदू नेता या देशाचा पंतप्रधान झाल्यानंतरही हिंदूनां आक्रोष करावा लागतोय, त्या नेत्याची शक्ती काय कामाची, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात, हिंदू असो, मुस्लिम असो वा ख्रिश्चन असो, कुठल्याही धर्मीयांना आक्रोष करायची वेळ आली नव्हती. आता माझ्यावर आरोप करतात की, मी हिंदुत्व सोडलं. पण मी हिंदुत्व सोडल्याचं एक उदाहरण मला दाखवून द्या, मी हिंदुत्व सोडलंय हे सिद्ध झालं तर मी मी घरी बसेन. काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असेल तुम्ही मुफ्ती मोहम्मद सईद आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत बसलात, तेव्हा काय सोडलं, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विचारला.
आमच्या हिंदुत्वाची मोजमापं घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. तुम्ही म्हणाल तोच हिंदू, तुम्ही म्हणाल तोच देशप्रेमी आणि तुम्ही म्हणाल तोच देशद्रोही, ही जर तुमची मस्ती असेल तर ती गाडण्यासाठी आम्ही ही वज्रमुठ तयार केली आहे, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.