'आघाडी करताना तंगड्यात तंगडं घातलं', उद्धव ठाकरेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 03:56 PM2019-03-17T15:56:13+5:302019-03-17T16:09:28+5:30
औरंगाबाद येथे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे अनेक मंत्री उपस्थित होते.
औरंगाबाद - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी युतीचं गुणगान गाताना आघाडीवर जबरी टीका केली आहे. 'आघाडी करताना हातात हात घालून तंगड्यात तंगडं घातलं आहे. त्यामुळे ते नक्कीच पडणार', असे म्हणत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर सडकून टीका केली. तसेच 'आपली युती फुलांसारखी सदैव टवटवीत ठेवणं आणि जनतेला त्याचा सुगंध देणं ही आपली जबाबदारी आहे, असेही उद्धव यांनी म्हटले.
औरंगाबाद येथे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे अनेक मंत्री उपस्थित होते. त्यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. 'आघाडी करताना हातात हात घालून तंगड्यात तंगडं घातलं आहे. त्यामुळे ते नक्कीच पडणार', असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आघाडीचा पराभव होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, आपली युती फुलांसारखी सदैव टवटवीत ठेवणं आणि जनतेला त्याचा सुगंध देणं ही आपली जबाबदारी आहे. 'शिवसेनाप्रमुखांनी नेहमी मला गोरगरीबांच्या मुलांची पहिली काळजी घ्यायला, त्यांचे लाड करायला पहिले शिकवले आहे. त्यामुळे माझा, 'भगवा उतरवणे तर सोडाच, कोणाचीही त्या भगव्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होता कामा नये, असा म्हणत उद्धव ठाकरेंनी आघाडीच्या नेत्यांना इशारा दिला आहे.
"आघाडी करताना हातात हात घालून तंगड्यात तंगडं घातलं आहे, पडणार ते नक्कीच."
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) March 17, 2019
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे pic.twitter.com/EE9jD7MNAI
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे :
जे काही वाद होते ते मिटले, जबाबदाऱ्यांचे वाटप झाले
इथे येईपर्यंत अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्याबाबत चर्चा होती.
महाभारतातल्या अर्जुनाप्रमाणे या अर्जुन खोतकर यांना देशद्रोह्याचा डोळा दाखवला.
संघर्ष झाला तो झाला, पण आता युतीची जबाबदारी आम्हा दोघांच्या खांद्यावर
संभाजीनगरमधले मूलभूत प्रश्न उदा. समांतर जलवाहिनी, कचऱ्याचा प्रश्न जे जे शक्य आहे ते करून आपण सोडवला पाहिजे
मराठवाडा हा भगव्याचा बालेकिल्ला. संभाजीनगरचा हिंदु हा कडवट. त्याला भगव्याचं महत्त्व माहीत आहे
आघाडीचे हातात हात आहेत, तर तंगड्यात तंगडं. ते आता पडणारच
शिवसेनेने कधीच मागून वार केले नाहीत. शिवसेनेने वारही समोरून केले आणि दोस्तीही समोरून केली.
मतभेद कधीही शिवसेनेने राज्याच्या हिताच्या आड येऊ दिले नाहीत
समृद्धी महामार्गावेळीही आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आम्ही पुढे गेलो
मुंबईकरांना 500 स्क्वेअरफूट घराचा मालमत्ता कर माफ करू, हे वचन निभावलं
नाणार इथला प्रकल्प रद्द केला.
इथले पाणी, चाऱ्याचा प्रश्नही सोडवले गेलेच पाहिजेत. शेतकऱ्यांचे कर्जही माफ झाले पाहिजे.
आता शिवसैनिकांनी आरामात राहू नका, युती झाली आता जनतेचे आशीर्वाद मिळवण्याची वेळ आहे.
एकवेळ मत मागून मिळतील, पण जनतेचे आशीर्वाद मागून मिळत नाहीत.
अनेक योजना जाहीर झाल्या आहेत, त्या राबवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मदत केंद्र सुरू करावीत
युतीने न लढता आपण वेगळं लढत होतो, तेव्हा विरोधकांना माज चढला होता. पण, युती झाल्यानंतर कुठेही त्यांच्या सभा झाल्या नाहीत
राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले की ईडीच्या भीतीने यांनी युती केली, ईडीची भीती कुणाला, तुम्हाला. या ईडापिडा तुमच्याकडे आहेत. आमच्याकडे नाहीत
आम्ही जे काही केलं ते खुलेपणाने केलं. पण, विरोधी पक्षातून जो टीका करेल तो पुन्हा त्या पक्षात राहीलच याची खात्री जनतेला राहिलेली नाही
आज आपण सत्तेपेक्षाही लोकांसाठी एकत्र आलो आहोत.
आम्हाला सत्ता गोरगरीबांसाठी हवी आहे