उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे 'परसेंटेज'चे हिंदुत्व...जो देईल, त्यांच्यासोबत ते जातात: संजय शिरसाट
By बापू सोळुंके | Published: February 3, 2024 02:05 PM2024-02-03T14:05:23+5:302024-02-03T14:12:52+5:30
उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वात जमीन आसमानचा फरक आहे: संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची संवाद यात्रा नसून ती टोमणे यात्रा होती. त्यांचे हिंदुत्व हे परसेंटेजचे हिंदुत्व... जो देईल, त्यांच्यासोबत ते जाता, असा टोला शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ता आ. संजय शिरसाट यांनी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.
आ. शिरसाट म्हणाले की, स्वत:च्या जिद्द आणि हट्टापायी त्यांनी काय, काय गमावले हे पाहा. स्व. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अनेकवेळा आरोप करणारे आता निष्ठावंत झाले. उद्धव यांना आता आराम करायची गरज असल्याचे ते म्हणाले. जाहीर सभांऐवजी ते आता सभागृहात बोलायला लागले, पुढे मंगल कार्यालयात बोलतील, असा टोला संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. आमच्यासाठी बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत पंतप्रधान, राष्ट्रपतींच्या खुर्चीपेक्षा किमती आहे. आम्ही ती खुर्ची राजन साळवीच्या घरून डोक्यावर घेऊन येऊ. तुमच्या आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वात जमीन आसमानचा फरक आहे. तुमचे हिंदुत्व हे परसेंटेजचे हिंदुत्व... जो देईल, त्यांच्यासोबत तुम्ही जाता, असा टोलाही त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आजूबाजूला गद्दारांची फौज आहे, हे लक्षात घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.
प्रकाश आंबेडकर स्वाभिमानी नेते
महाविकास आघाडीची बैठक म्हणजे केवळ बैठक दाखविण्याचा प्रकार आहे. प्रकाश आंबेडकर बैठकीला उपस्थित राहिले, तरी ते इंडिया आघाडीत जाणार नाहीत. ते स्वाभिमानी आहेत. शरद पवार गटात तर कुणीही नाही. उबाठामध्ये जे राहिले आहेत, ते देखील आचारसंहिता लागण्यापूर्वी येतील बघा, असे विधान संजय शिरसाट यांनी केले.