शहासोबतची उद्धव ठाकरेंची भेट सौदेबाजीसाठीच; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 01:12 PM2018-06-06T13:12:24+5:302018-06-06T13:28:48+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा आज सायंकाळी मातोश्रीवर जात आहेत.
- विशाल सोनटक्के
नांदेड: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा आज सायंकाळी मातोश्रीवर जात आहेत. स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचा या भेटीच्या माध्यमातून वाटाघाटीतून करुन नेहमीप्रमाणे काही पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न राहिल. अशी टिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केली. शेतकऱ्यांसह महाराष्ट्रातील जनता सध्या विविध समस्यांनी होरपळून गेली आहे. मात्र सर्वसामान्यांच्या या प्रश्नांचे या दोन्ही पक्षांना काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे या भेटीतून राज्यातील सर्वसामान्यांच्या पदरात काहीही पडणार नाही.असे ते म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी आज सकाळी नांदेड येथे खास ‘लोकमत’शी संवाद साधला. शिवसेना आणि भाजपा २०१४ पासून सत्तेत एकत्रित आहेत. मात्र या दोन्ही पक्षांनी ही युती केवळ स्व:ताच्या स्वार्थासाठी केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जनतेच्या भल्याची अपेक्षा करणे चुकिचे असल्याचे सांगत, महाराष्ट्र या दोन्ही पक्षातील लुटूपुटूची लढाई मागील चार वर्षापासून पहात आहे. आज मातोश्रीवर होणाऱ्या दोघांच्या भेटीवेळी बार्गेनिंग करुन सेनेला आणखी काही मिळते का? याचा प्रयत्न उध्दव ठाकरे करतील. हा प्रकार महाराष्ट्राच्या चांगलाच परिचयाचा झालेला असल्याने या भेटीला महत्व देण्याची आवश्यकता वाटत नसल्याचेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांत सरकारविरोधी असंतोष
राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली असून, शेतकऱ्यांत सरकारविरोधी असंतोष खदखदत आहे, अशा स्फोटक परिस्थिीतीत शेतकरी हिताचे निर्णय घेवून दिलासा देण्याची गरज आहे. शेतकरी संपाचा आज पाचवा दिवस आहे. संपाच्या तोंडावर आज सरकार विविध घोषणा करीत आहे. हेच निर्णय यापूर्वी घेतले असते तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला असता, अजूनही वेळ गेलेली नाही, शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर सरकारने किमान आधारभूत दराची अंमलबजावणी करायला हवी, असे ते म्हणाले.
सरकार विरोधी लढा तीव्र करणार
गुजरात आणि त्यानंतर कर्नाटक निवडणुकांचे निकाल पाहिल्यानंतर जनता पुन्हा काँग्रेसच्या पाठिशी उभी राहत असल्याचे दिसून येते. शेतकरी, बेरोजगार, महिला, सर्वसामान्य नागरिक यांच्या हितासाठी सरकारने मागील चार वर्षांत काहीही केले नाही. सरकारचे कसलेही नियंत्रण न राहिल्याने शेतकरी मरत असून, दलालांची सध्या चांदी होताना दिसत आहे. महागाईचा प्रश्न सरकारच्या धोरणांमुळेच जटील झाला आहे. इंधनाचे दर आकाशाला भिडल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. यासर्व प्रश्नासंदर्भात विविध आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस सरकारला जाब विचारत आहे. आमचा सरकारविरोधातील लढा सुरु आहे. आगामी काळात तो अधिक तिव्र करण्यात येईल. मात्र आता सर्वसामान्य लोकांनीही भूमिका घेण्याची वेळ आल्याचे सांगत, सरकारच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्राने एकजुटीने उभे राहायला हवे, असे आवाहनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केले.