"भद्रामोरुतीचं दर्शन उद्धवजींनी केलं अन् माझं काम झालं..."! तिकीट मिळाल्यानंतर चंद्रकांत खैरेंची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 12:14 PM2024-03-27T12:14:26+5:302024-03-27T12:15:27+5:30
अखेर आज ठाकरे गटाने थेट 17 जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. शिवेसना ठाकरे गटाच्या उमेदवारांची ही यादी खासदार संजय राऊत यांनी ट्विट केली आहे. यात छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचाही समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून, जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या बैठकांवर बैठका सुरू होत्या. काही जागांवरून मतभेदही होते. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्यावरूनही खल सुरू होता. यातच महाविकास आघाडीत 22-16-10 असा फॉर्म्यूला ठरल्याच्या बातम्याही आल्या. मात्र अखेर आज ठाकरे गटाने थेट 17 जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. शिवेसना ठाकरे गटाच्या उमेदवारांची ही यादी खासदार संजय राऊत यांनी ट्विट केली आहे. यात छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचाही समावेश आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) त्यांना सलग सहाव्यांदा उमेदवारी दिली आहे. यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
खैरे म्हणाले, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, यांच्या आशीर्वादाने मला तिकीट मिळाले. संजय राऊत, आदित्य ठाकरे, अनिल देसाई आदी सर्वांच्या सहकार्याने मला उमेदवारी मिळाली. मी या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो. उद्धव साहेबांनी न्याय दिला. मी उद्धव ठाकरे यांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. कारण ही माझी शेवटची निवडणूक आहे आणि मी जिंकणार." तसेच, जनतेचीही मागणी हेती की, कुठल्याही परिस्थितीत चंद्रकांत खैरे यांनाच तिकीट मिळायला हवे आणि तेच निवडून येतील," असेही खेरे यांनी यावेळी सांगितले. ते एबीपी माझ्यासोबत बोलत होते.
भद्रामोरुतीचं दर्शन उद्धवजींनी केलं अन्... -
यावेळी प्रतिस्पर्धक कोण? कारण यावेळी भाजप सोबत नसणार, यासंदर्भात बोलताना खैरे म्हणाले, "भजप सोबत नसले म्हणून काय झाले? महाविकास आघाडी असेलना. काँग्रेस आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी आहे आणि आम्ही, आम्ही सर्व एकत्र आहोत. तसेच, प्रतिस्पर्धक कोण महायुती की एमआयएम? यासंदर्भात बोलताना खैरे म्हणाले, कुणीही येऊदेत हो, उद्धव ठाकरे जिंदाबाद." याच वेळी, "मी विशेष म्हणजे, भद्रामारुतीचे आभार मानेल, भद्रामोरुतीचं दर्शन माननीय उद्धवजींनी केलं आणि माझं काम झालं," असेही खेरे म्हणाले.