उज्ज्वलाने राॅकेल नेले, तर महागाईने गॅस हिरावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:06 AM2021-03-26T04:06:19+5:302021-03-26T04:06:19+5:30
गल्ले बोरगाव : स्वयंपाक करताना गोरगरीब महिलांच्या डोळ्यांतून येणारे पाणी केंद्र शासनाला बघवत नसल्याने, महिलांना उज्ज्वला योजनेंतर्गत माफक दरात ...
गल्ले बोरगाव : स्वयंपाक करताना गोरगरीब महिलांच्या डोळ्यांतून येणारे पाणी केंद्र शासनाला बघवत नसल्याने, महिलांना उज्ज्वला योजनेंतर्गत माफक दरात गॅस दिले. बदल्यात रॉकेल बंद केले. मात्र, आता गोरगरिबांना दरवाढीमुळे स्वयंपाकाचा गॅस परवडत नाही. उज्ज्वलाने रॉकेल नेले, तर महागाईने गॅस हिरावला, अशी म्हण्याची वेळ ग्रामीण भागातील महिलांवर आलेली आहे.
शासनाच्या उज्ज्वला योजनेंतर्गत कमी दरामध्ये गोरगरिबांना गॅसचे कनेक्शन देण्यात आले. आता गॅस दरवाढीमुळे गॅस भरण्यासाठी ८३० रुपयांचा खर्च येऊ लागला आहे. ग्रामीण भागांमध्ये मजुरी करून पोट भरणे कठीण झाले आहे. त्यात वाढती महागाई असल्याने ग्रामीण भागातील महिलांना ८३० रुपयांचा गॅस भरणे परवडत नाही. चुलीवरच स्वयंपाक केल्याशिवाय पर्याय नाही. बरी कमाई असणाऱ्या काही कुटुंबात चहा गॅसवर केला जात आहे, तर स्वयंपाक मात्र चुलीवरच करीत असल्याचे चित्र आहे.
गल्ले बोरगावसह परिसरातील दारिद्र्यरेषेखालील व अल्पभूधारकांना शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस वितरण केले. शिधापत्रिकेवर गॅसचा शिक्का लावत रॉकेल बंद केले. उज्ज्वला योजनेच्या मागे लागल्याने गल्ले बोरगाव शिवारातील काही गावे रॉकेलमुक्त झाली आहेत. यात शासनाच्या अनुदानाची बचत असली, तरी ग्रामीण भागात रॉकेल मिळत नाही.
वीज खंडित झाल्यानंतर ग्रामस्थांना व रात्रीच्या वेळेस शेतीची राखण करण्याकरिता जाणाऱ्या शेतकऱ्यांना रॉकेलच्या दिव्याचा आधार होता. मात्र, तो आधारही हिरावून घेतला आहे.
दैनंदिन वापरासाठी व अत्यावश्यक वस्तू म्हणून गॅस सिलिंडरचा वापर होतो. त्यामुळे इंधन म्हणून वापरण्यात येणारे लाकूड, भुसा, रॉकेल खूप मागे पडले आहे. अत्यावश्यक झालेल्या गॅस सिलिंडरचा दर वाढत असल्याने आमचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया महिलावर्गाने दिल्या.
महिन्याचे बजेट कोलमडले
घरगुती गॅस सिलिंडरच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. केवळ गॅस सिलिंडर दरवाढ नाही; तर त्याच्याशी जोडणाऱ्या सर्वच वस्तूंची दरवाढ होते. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. महागाईला आळा बसविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ठोस कारवाई करण्याची गरज आहे.