उलेमा बोर्डाचा वंचितला पाठिंबा; २५ मुस्लिम उमेदवार देणार - प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 02:36 AM2019-09-14T02:36:34+5:302019-09-14T02:37:02+5:30
कापसाला शासनाने ५ हजार ५०० रु. प्रति क्विंटल भाव जाहीर केला; पण दीड हजार रुपये स्वस्ताने अमेरिकेचा कापूस भारतात येतोय.
औरंगाबाद : ऑल इंडिया उलेमा बोर्डाने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा जाहीर केला असून, त्यांच्या पाठिंब्यावर वंचित बहुजन आघाडी एकूण २५ मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवत असल्याची घोषणा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रपरिषदेत केली. बोर्डाचे अध्यक्ष मौलवी उस्मान रहमान शेख व नायब अन्सारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
जालना येथील आलुतेदार-बलुतेदार सत्ता संपादन मेळाव्यास मार्गदर्शन करून ते सायंकाळी औरंगाबादेत आले होते. ‘एमआयएम सोडून गेलेली आहे. आम्ही नाही. यशासाठी त्यांना आमच्या शुभेच्छा. असदुद्दीन ओवेसी हे मला मोठे भाऊ मानतात. ते नाते अजूनही कायम आहे. फक्त राजकीय संबंध संपले. भूमिका त्यांनी बदलली. आमच्या भूमिकेत बदल झालेला नाही, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, वामनराव चटपांची शेतकरी संघटना, भाकप, माकप, सत्यशोधक कम्युनिष्ट पार्टी, लाल निशाण पक्ष यांच्याशी आमची आघाडी होईल.
नेते संपवले, कार्यकर्ते संपवले का हा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया भाजप पक्ष प्रवेशासंबंधाने नोंदवत आंबेडकर म्हणाले, आम्ही भाजपची बी टीम, रा.स्व. संघ धार्जिणे ही टीका मागच्या चाळीस वर्षांपासून सहन करीत आलो आहोत; पण रा.स्व. संघाच्या विरोधात माझ्याइतके ताकदीने लढणारे कुणी नसावे. भान ठेवून टीका केली जायला हवी. अशा टीकेची मला चिंता नाही.
कापसाला शासनाने ५ हजार ५०० रु. प्रति क्विंटल भाव जाहीर केला; पण दीड हजार रुपये स्वस्ताने अमेरिकेचा कापूस भारतात येतोय. याचा अर्थ सरकार भारतीय कापूस उत्पादकांना ३ हजार ५०० च्या वर भाव देऊ शकणार नाही. म्हणजेच ट्रम्पला मोदींनी दिलेल्या टाळीची किंमत मोजावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी १० आॅक्टोबरला कापूस खरेदीचा मुहूर्त काढावा. या निवडणुकीत शेतकरी जातीला महत्त्व देतो की कापसाच्या भावाला हे पाहावयाचे आहे, असा मुद्दा त्यांनी मांडला.
विरोधी पक्ष जगला नाही तर वाटोळे...
एखाद्या दारुड्या माणसासारखी या सरकारची अवस्था झाली आहे. महाराष्ट्रातही २५० जागा आमच्याच निवडून येतील, असा दावा आता मुख्यमंत्री करू लागले आहेत. लोकशाहीत विरोधी पक्ष मजबूत हवा. तो जगला नाही तर वाटोळे होईल. बहुमतामुळे सत्ताधाऱ्यांची वाटचाल जणू हुुकूमशाहीकडेच सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.