उमाचीवाडी तलावाची पाणी पातळी चिंताजनक

By Admin | Published: September 13, 2014 11:29 PM2014-09-13T23:29:17+5:302014-09-13T23:29:17+5:30

ईट : भूम तालुक्यातील उमाचीवाडी परिसरामध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळेच या भागातील शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांना आतापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावू लागला आहे.

Umchivadi lake water level is worrisome | उमाचीवाडी तलावाची पाणी पातळी चिंताजनक

उमाचीवाडी तलावाची पाणी पातळी चिंताजनक

googlenewsNext


ईट : भूम तालुक्यातील उमाचीवाडी परिसरामध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळेच या भागातील शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांना आतापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावू लागला आहे. तर शेतकऱ्यांना पिकांच्या पाण्याची चिंता भेडसावू लागली आहे. आजवर या प्रकल्पाच्या पाणीपातळीत केवळ एका फुटाने वाढ झाली आहे.
मागील चार वर्षापूर्वी उमाच्यावाडीनजीक साठवण तलावाची उभारणी करण्यात आली. तलावाच्या सांडव्याचे काम गतवर्षी पूर्ण करण्यात आले. मात्र सलग दोन वर्ष अत्यल्प पाऊस झाल्यामुळे साठवण तलाव एकदाही पूर्ण क्षमतेने भरला नाही. गतवर्षीच्या पावसाळ्यामध्ये सरासरीच्या ५० टक्के पाऊस झाल्याने तलावामध्ये केवळ ५० टक्केच साठा शिल्लक होता. उन्हाळ्यामध्ये परिसरातील अनेक गावे भीषण टंचाईचा सामना करीत असताना या तलावाद्वारे संबंधित गावातील ग्रामस्थांची तहान भागविण्यात आली. पाणीचोरी होवू नये म्हणून प्रकल्प क्षेत्रातील विद्युत मोटारीचे कनेक्शन तोडण्यात आले होते. दरम्यान, मागील दहा-पंधरा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढली आहे. असे असले तरी नागेवाडी, वडाचीवाडी आणि उमाचीवाडी या भागामध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने उमाचीवाडी साठवण तलावात सध्या मृतसाठा शिल्लक आहे. आजवरच्या पावसामुळे केवळ एक फुटाने पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे उर्वरित पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
काक्रंबा : पावसाळा सुरु होवून साडेतीन ते चार महिन्याचा कालावधी संपत आला आहे. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा परिसरात मात्र साडेतीन महिन्यात एकही मोठा पाऊस न झाल्याने परिसरातील दहा गावचे साठवण तलाव, बंधारे अद्याप कोरडेच असल्याने या भागात दुष्काळी स्थिती कायम आहे.
वरुणराजाच्या अवकृपेने यावर्षी दीड महिन्यानंतर पावसाने सुरुवात केल्याने खरीपाच्या पेरण्या दीड महिना उशिराने झाल्याने खरीपाच्या उत्पन्नावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, मध्यंतरीच्या काळात खरीपाच्या पेरण्या झाल्यानंतर पुन्हा १५ ते २० दिवस पावसाने ओढ दिल्याने कोवळी पिके माना टाकू लागली होती.
त्यामुळे या भागात सर्वत्र दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने खरीप हंगाम हातचा जाण्याची शक्यता होती. मात्र मागील काही दिवसांत झालेल्या दरमदार पावसामुळे खरीप पिकांना संजीवनी मिळाली असली तरी पण काक्रंबा परिसरातील मोर्डा, तडवळा, बारुळ, व्होनाळा, काक्रंबा, काक्रंबावाडी, वडगाव (लाख), खंडाळा, जवळगा (मे), कार्ला, कानेगाव आदी गावच्या परिसरात साडेतीन महिन्याच्या काळात अद्याप एकदाही दमदार मोठा पाऊस झाला नसल्याने वरील १० ते १२ गावचे साठवण तलावात एक टक्का देखील पावसाचे पाणी आले नसून, या भागातील नदी, नाले, तलाव, ओढे, बंधारे, विहिरी कोरड्या ठाक पडल्या असून, या भागातील साठवण तलावात सध्या १५ ते २० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने अद्याप परिसरात दुष्काळी परिस्थिती कायम असून, शेतकऱ्यांची बोअर बंद पडू लागले आहेत. त्यामुळे येत्या १५ दिवसात या भागात मोठा पाऊस न झाल्यास काक्रंबा परिसरातील १० गावांना भविष्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

Web Title: Umchivadi lake water level is worrisome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.