पोहता येत नसताना मित्राला थर्माकोल घेऊन उतरवले, गाळात फसून दोन मित्रांचा मृत्यू
By सुमित डोळे | Published: April 12, 2024 10:54 AM2024-04-12T10:54:09+5:302024-04-12T10:55:14+5:30
सातारा परिसरातील घटना, एक फूड टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी
छत्रपती संभाजीनगर : एका मित्राला पोहता येत नसताना त्याला थर्माकोलचा तराफा देऊन दोघे मित्र त्याला विहिरीत घेऊन उतरले. मात्र, तरीही विहिरीत खोल पाण्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू झाला. सचिन शेषराव काळे (२५, रा. सातारा गाव) व वैभव सुभाष मोरे (२३, रा. ह. मु. गारखेडा, सटाणा, नाशिक) असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
सचिन, वैभव, शुभम निकम व अनिरुद्ध कुलकर्णी हे चौघेही मित्र होते. गुरुवारी सुट्टी असल्याने चौघेही सातारा गावात फिरायला गेले होते. सातारा परिसरातील भारती विद्यापीठाच्या जागेजवळ फिरत असताना तेथील विहिरीत पोहण्याचा निर्णय घेतला. सचिन व अनिरुद्धला पोहता येत होते तर वैभवला पोहता येत नव्हते. तरीही वैभवने विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला. वैभवने जवळच पडलेले थर्माकोल घेऊन पोहण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्यात अचानक धाप लागली व त्याच्या हातातले थर्माकोल सुटले. वैभव बुडायला लागला. त्याचा आरडाओरडा ऐकून सचिनने त्याच्याकडे धाव घेतली. सचिन त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील करत होता. मात्र, भेदरलेल्या वैभवने वाचण्याच्या प्रयत्नात सचिनच्या कंबरेला पकडले. परिणामी, दोघेही खोल पाण्यात बुडाले.
प्राथमिक माहितीनुसार, शुभम बाहेरच उभा होता. अनिरुद्धने दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला त्यात अपयश आले. घटनेची माहिती कळताच सातारा पोलिसांसह विजय राठोड, श्रीकृष्ण होळंबे, योगेश दुधे, राजू ताठे, सुभाष दुधे यांनी धाव घेतली. बुडालेल्या सचिन, वैभवला बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले.
मूळ सातारा गावात राहणारा सचिन केटरिंगचे काम करत होता, तर वैभव फूड टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी होता. रात्री त्यांच्या नातेवाइकांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांचे प्राध्यापक देखील घाटी रुग्णालयात दाखल झाले.