मंजूर न झालेला ठराव इतिवृत्तात घुसडला; विद्यापीठ क्रीडा विभागातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 08:09 PM2020-02-25T20:09:53+5:302020-02-25T20:11:02+5:30
प्रशिक्षकांना त्रास देण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या ठरावाचा दुरुपयोग?
- राम शिनगारे
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ठराव केला उस्मानाबाद उपकेंद्रात ‘स्पोर्टस् अॅक्टिव्हिटी’ वाढविण्याचा; परंतु या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाने बोलावलेल्या बैठकीच्या इतिवृत्तात चक्क दुसराच विषय घुसडल्याचे समोर आले. विशेष म्हणजे त्या इतिवृत्तात व्यवस्थापन परिषदेच्या नावावर तिसराच ठराव दाखवून इतिवृत्तालाही व्यवस्थापन परिषदेची मंजुरी घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली. ही कागदपत्रेच ‘लोकमत’ प्रतिनिधीच्या हाती लागली आहेत.
विद्यापीठात शारीरिक शिक्षणशास्त्र आणि क्रीडा विभाग आहे. क्रीडा विभागांतर्गत संलग्न महाविद्यालयांतील क्रीडा विभागाच्या सहकार्याने स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या विभागाचा संचालक मागील अनेक वर्षांपासून संलग्न महाविद्यालयातील होता. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी महाविद्यालयातील प्राध्यापकांकडे विद्यापीठातील विविध विभागांचे पदभार काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या विभागाचा पदभार शारीरिक शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना झरीकर यांच्याकडे सोपविण्यात आला.
दि. ७ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सदस्य संजय निंबाळकर यांनी उपकेंद्रात ‘स्पोर्टस् अॅक्टिव्हिटी’ वाढविण्याचा ठराव मांडला होता. हा एक ओळीचा ठराव बैठकीत मंजूर झाला. यानंतर क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाची दि.१६ नोव्हेंबर २०१९ रोजी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तीत एकूण १२ विषय चर्चेसाठी ठेवले होते. त्यात ‘स्पोर्टस् अॅक्टिव्हिटी’च्या ठरावाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने १२ व्या क्रमांकावर ‘उस्मानाबाद येथील उपकेंद्रात क्रीडा विभाग व एम.पी.एड. अभ्यासक्रम सुरू करणे’ हा विषय होता. या बैठकीचे इतिवृत्त २८ नोव्हेंबरला तयार झाले. या इतिवृत्तात ७ सप्टेंबरच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ‘क्रीडा विभागातील मार्गदर्शकांना उपकेंद्रात क्रीडा विभागाचा विकास करण्यासाठी साखळी पद्धतीने ३ महिने किंवा ६ महिन्यांनी पाठविण्याचे ठरले आहे’, असा निर्णय झाल्याचे नमूद आहे. बदलीची चर्चा शिक्षण मंडळाच्या बैठकीत झालेली नाही, असे सदस्य डॉ. उदय डोंगरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. व्यवस्थापन परिषदेच्या ठरावात छेडछाड व क्रीडा मंडळात न झालेली चर्चा इतिवृत्तामध्ये समाविष्ट केली कुणी? या इतिवृत्ताला व्यवस्थापन परिषदेनेही नुकत्याच झालेल्या बैठकीत डोळे झाकून मंजुरी दिली.
उपकेंद्रात क्रीडा विभागच नाही
विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात क्रीडा व शारीरिक शिक्षणशास्त्र विभागच अस्तित्वात नाही. त्यामुळे विद्यार्थी नसताना विद्यापीठाच्या विभागातील मार्गदर्शकांच्या बदल्या त्याठिकाणी करण्याचे इतिवृत्तात का दाखविले आहे. विद्यापीठात पाच विभाग अस्तित्वात आहेत. ते बंद करून मार्गदर्शकांना त्रास देण्यासाठी हा प्रयत्न सुरूअसल्याचे स्पष्ट होत आहे.