औरंगाबाद जिल्ह्यात अप्रमाणित औषधी खरेदी; राज्यस्तरावर होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 07:50 PM2020-01-30T19:50:17+5:302020-01-30T19:54:52+5:30
आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे कानावर हात
औरंगाबाद : आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत दोन वर्षांपूर्वी अप्रमाणित औषधी खरेदी झाल्याचा संशय व्यक्त होत होता. शासनमान्य कफ सिरपऐवजी सुमारे ३६ लाख रुपयांची अप्रमाणित कफ सिरपची खरेदी झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी राज्यस्तरावरून चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी दिली.
याविषयी मिळालेली माहिती अशी, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा, जिल्हा रुग्णालयांसाठी औषधी साहित्य खरेदीसाठी जिल्हा नियोजन विकास समितीकडून निधी दिला जातो. दोन वर्षांपूर्वी मिळालेल्या निधीतून ही कफ सिरपची खरेदी करण्यात आली. खरेदीसाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयात तांत्रिक मान्यतेसाठी संचिका दाखल करण्यात आलेली होती. त्यात शासनमान्य यादीतील कफ सिरप खरेदी केली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले. हाफकीन मंडळाकडून औषधी प्राधान्याने खरेदी करण्याचे निर्देश आहेत; परंतु हाफकीनच्या यादीत औषधी नसल्याचे कारण पुढे करून स्थानिक पातळीवरून औषधी खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या कफ सिरपमधील रासायनिक घटक वापरण्यासाठी प्रतिबंध असल्याचे सांगण्यात येते; परंतु ही औषधी रुग्णांना देण्यात आली की, ती परत पाठविण्यात आली, याविषयी आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून सांगण्याचे टाळले जात आहे.
याप्रकरणी स्थानिक पातळीवर चौकशी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनानेही पडताळणी केली; परंतु दोन वर्षांनंतरही या प्रकरणाची चौकशी सुरूच आहे. आता राज्यस्तरावरून चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे याप्रकरणी नेमकी कोणावर कारवाई होते, याकडे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. आरोग्य विभागात यापूर्वी लाखो रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याचे समोर आले होते. आता अप्रमाणित औषधी खरेदी झाल्याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.
पडताळणी केली : कप सिरफ खरेदीप्रकरणी आलेल्या पत्रावरून पडताळणी करण्यात आली होती. त्याबाबत वरिष्ठ कार्यालयास माहिती देण्यात आली आहे, असे अन्न व औषध प्रशासनाचे (औषध) संजय काळे यांनी सांगितले.
माहिती गोपनीय : अप्रमाणित कफ सिरप खरेदीप्रकरणी राज्यस्तरावरून चौकशी केली जाणार आहे. गोपनीयतेमुळे झालेल्या नेमक्या प्रकाराविषयी अधिक माहिती देता येणार नाही, असे आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे म्हणाले.