जाच असह्य झाला, एसटी आगारप्रमुखांच्या कार्यालयासमोरच चालकाने घेतले विष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 07:49 PM2022-10-15T19:49:53+5:302022-10-15T19:50:36+5:30
पैठण येथे आगारप्रमुखांच्या जाचाला कंटाळून चालकाने घेतले विष, औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात उपचार सुरू
पैठण (औरंगाबाद) : आगारप्रमुखांनी नेहमीच्या ठरवून दिलेल्या ड्युटीमध्ये पूर्वकल्पना न देता अचानक बदल केला. त्यामुळे या मनमानी व जाचाला कंटाळून त्रस्त झालेल्या एका बसचालकाने आगारप्रमुखांच्या कार्यालयासमोरच विष प्राशन केले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना शनिवारी दुपारी घडली. अशोक विश्वनाथ थोरात (वय ४७, रा. आगर, नांदर, ता. पैठण) असे चालकाचे नाव असून, त्यांना औरंगाबाद येथे घाटीत उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
पैठणचे आगारप्रमुख सुहास तरवडे यांनी ज्येष्ठतानुसार चालक-वाहकांच्या ड्युटी मार्गात अचानकपणे बदल केला. बसचालक अशोक थोरात यांनी आगारप्रमुखांची भेट घेत त्यांच्याकडे लेखी तक्रार देऊन ड्युटीत बदल करू नये, अशी विनंती केली. परंतु, त्यांच्या तक्रारीची दखल न घेता काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांना त्रास देणे सुरू असल्याचा आरोप चालक थोरात यांनी केला होता. या जाचाला कंटाळून शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास थोरात यांनी आगारप्रमुखांच्या कार्यालयासमोर खिशातून आणलेल्या विषाचे प्राशन केले. हा प्रकार आगारातील इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याबरोबर धावपळ उडाली. त्यांनी थोरात यांना तातडीने पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती ढासळत चालल्याने त्यांना तत्काळ औरंगाबादला घाटीत हलविण्यात आले.
घटनेची चौकशी करून कारवाई करणार - पालकमंत्री भुमरे
पैठण आगारात वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका चालकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार दुर्देवी आहे. या घटनेची चौकशी करून सत्य समोर आल्यावर दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे रोहयो मंत्री तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
तक्रार आल्यास चौकशी
सेवा जेष्ठता, रोटेशन नुसार कर्तव्य दिले जाते. चालक ठराविक ड्युटीसाठी हट्ट करत होता. या प्रकरणी कोणाची तक्रार आल्यास चौकशी करण्यात येईल.
- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक