बेशिस्त वाहनचालकांनो सावधान; दंडाच्या नोटिसा पोहोचणार पोस्टाद्वारे घरपोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:59 PM2018-08-13T12:59:31+5:302018-08-13T13:00:37+5:30
सावधान... बेशिस्त वाहनचालकांनो, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच पोलीस आता त्यांच्या मोबाईल आणि हॅण्डी कॅमेऱ्यांद्वारे तुमचे छायाचित्र काढत आहेत.
औरंगाबाद : सावधान... बेशिस्त वाहनचालकांनो, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच पोलीस आता त्यांच्या मोबाईल आणि हॅण्डी कॅमेऱ्यांद्वारे तुमचे छायाचित्र काढत आहेत. एवढेच नव्हे, तर तुमच्या घरच्या पत्त्यावर छायाचित्रासह घरपोच दंडाची नोटीस प्राप्त होणार आहे. पोलिसांनी नुकताच हा उपक्रम सुरू केला आहे. एवढेच नव्हे, तर पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न कराल, तर त्याचेही छायाचित्रण पोलिसांच्या शरीरावरील कॅमेऱ्याद्वारे केले जात आहे.
पंधरा लाखांची लोकसंख्या असलेल्या शहरातील वाहनांची संख्याही आता अकरा ते बारा लाखांपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या वाहनसंख्येच्या तुलनेत वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ म्हणावे तसे वाढले नाही. शहरात सध्या सिडको, शहर विभाग क्रमांक १ आणि २, छावणी आणि वाळूज, अशा पाच वाहतूक शाखा कार्यरत आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, सहायक आयुक्त एच.एस. भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांसह सुमारे साडेतीनशे कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. असे असले तरी केवळ ७५ टक्केच कर्मचारी कर्तव्यावर हजर असतात.
रजा, साप्ताहिक सुटीसह अन्य कार्यालयीन कामकाजामध्ये उर्वरित कर्मचारी असतात. प्रत्येक चौका-चौकातील वाहतूक सिग्नलवर वाहतूक नियमन करण्यासोबतच नियम मोडून वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई पोलीस करीत असतात; मात्र एकाचवेळी अनेक वाहनचालकांनी नियम तोडला, तर एक हवालदार एकावेळी एका जणावरच कारवाई करू शकतो, अशावेळी अन्य बेशिस्त वाहनचालक संधी साधून तेथून पळून जातात. असा हा नित्याचाच अनुभव वाहतूक पोलिसांना येतो. ही बाब लक्षात घेऊन सिडको वाहतूक विभागाचे निरीक्षक हेमंत गिरमे यांनी वरिष्ठांच्या आदेशाने बेशिस्त वाहनचालकांचे मोबाईलवर छायाचित्र काढा, असे आदेश दिले. त्यानुसार आता कारवाई सुरू झाली आहे. गिरमे यांनी शनिवारी हर्सूल टी पॉर्इंटसह विविध ठिकाणी बेशिस्त वाहनचालकांचे त्यांच्या मोबाईलवर छायचित्रे काढली .
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई गरजेची
याविषयी बोलताना पोलीस निरीक्षक गिरमे म्हणाले की, बेशिस्त वाहनचालक सिग्नलवर थांबत नाही, स्टॉप लाईन पाळत नाही, कार चालविताना सीट बेल्ट न लावणे, विना हेल्मेट दुचाकी चालवितात. हे पोलिसांना दिसते; मात्र एकाचवेळी त्यांच्यावर कारवाई करणे पोलिसांना शक्य होत नाही. म्हणून त्यांचे छायाचित्र काढून त्यांना आता पोस्टाद्वारे घरपोच नोटिसा पाठविण्यास सुरुवात झाली.