‘पेट’च्या दुसऱ्या पेपरवर अनिश्चिततेचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:05 AM2021-02-27T04:05:11+5:302021-02-27T04:05:11+5:30
औरंगाबाद : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दोन-चार दिवसांत शासन मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील, त्यानुसार ‘पेट’च्या दुसऱ्या पेपरचे नियोजन करण्याचा ...
औरंगाबाद : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दोन-चार दिवसांत शासन मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील, त्यानुसार ‘पेट’च्या दुसऱ्या पेपरचे नियोजन करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे तूर्तास तरी या परीक्षेवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. तथापि, अगोदरच चार वर्षांच्या दीर्घ खंडानंतर यावर्षी पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली; मात्र ‘पेट’च्या पहिल्या पेपरमध्ये झालेल्या अनियमिततांच्या तक्रारी झाल्यामुळे विद्यापीठाने दुसरा पेपर केंद्रावर घेण्याचा निर्णय घेतला. आता दुसऱ्या पेपरला ‘कोरोना’चा अडसर येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.
पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेचा (पेट) दुसरा पेपर नियोजित वेळापत्रकानुसार रविवारी २१ फेब्रुवारी रोजी घेतला जाणार होता. तथापि, संगणकांची उपलब्धता व आसन व्यवस्थेचा अंदाज घेण्यासाठी २१ फेब्रुवार रोजी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. याबाबत शुक्रवार, २६ फेब्रुवारी रोजी प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक झाली; मात्र अलिकडे कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्यामुळे शासन काय निर्णय घेते, त्यानुसार ‘पेट-२’ चे नियोजन करण्याचे या बैठकीत ठरले. या बैठकीत परीक्षेला प्रविष्ठ होणारे विद्यार्थी, केंद्रांवर ऑनलाइन परीक्षेबाबत त्यांचा कल आणि चारही जिल्ह्यांत उपलब्ध होणाऱ्या संगणक व आसन व्यवस्थेसंबंधीची माहिती जाणून घेतली.
‘पेट’च्या पहिल्या पेपरमध्ये उत्तिर्ण झालेले ६ हजार ७७५ विद्यार्थी दुसऱ्या पेपरसाठी पात्र झाले आहेत. यापैकी किती विद्यार्थी दुसरा पेपर देण्यासाठी इच्छुक आहेत, त्याचा अंदाज ‘गुगल डॉक्स फॉर्म’द्वारे घेण्यात आला. त्यानंतर औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यात कोणत्या महाविद्यालयाकडे किती संगणक व आसनव्यवस्था उपलब्ध होऊ शकते, याचा आढावा घेण्यात आल्याचे प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले.
चौकट............
९५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ म्हणाले की, या दोन- चार दिवसांत कोरोनासंबंधी शासनाच्या मार्गदर्शक सूचना अपेक्षित आहेत.
त्यानुसार ‘पेट-२’चे नियोजन केले जाईल. ‘गुगल डॉक्स फॉर्म’च्या माध्यमातून केंद्र निवडण्यासंबंधी विद्यार्थ्यांकडून माहिती
मागविण्यात आली होती. जवळपास ९५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.