मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या काका, मामाला १० वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:29 PM2020-10-17T12:29:39+5:302020-10-17T12:38:24+5:30
Rape On Minor घटना उघडकीस आणलेल्या शिक्षिकेसह सहशिक्षिका आणि पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली.
औरंगाबाद : सहावीत शिकणाऱ्या मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली मुलीच्या मावशीचा पती (काका) आणि नात्याने चुलत मामा असलेल्या आरोपींना विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी गुरुवारी (दि.१५) प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास तसेच पीडितेच्या मावशीला तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. आरोप सिद्ध होण्यासाठी घटना उघडकीस आणलेल्या शिक्षिकेसह सहशिक्षिका आणि पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली.
७ सप्टेंबर २०१७ रोजी पीडिता शाळेत गेल्यानंतर रडत असल्यामुळे शिक्षिकेने चौकशी केली असता मुलीने सांगितले की, आई-वडील नसल्यामुळे ती मावशीकडे राहते. तिला घरातील सर्व कामे करावी लागतात. न केल्यास घराबाहेर काढण्याची धमकी दिली जाते. तिला रात्री शौचालयात झोपवतात. घटनेच्या रात्री शौचालयात झोपलेली असताना मावशीचा पती आणि चुलत मामा यांनी तिचे लैंगिक शोषण केले होते. याबाबत कोणाला सांगितले तर जिवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती. मावशीला सांगितले तर काम जड झाले म्हणून खोटे आरोप करतेस, असे ती म्हणाली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून शिक्षिकेने सहशिक्षिकेला सोबत घेऊन मुख्याध्यापक आणि स्थानिक नगरसेवकांच्या कानावर घटना टाकली. शिक्षिकेने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविले.
पॉक्सो कायद्यातहत सुनावली शिक्षा
न्यायालयाने दोन्ही पुरुष आरोपींना बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) चे कलम ४ आणि ६ नुसार प्रत्येकी १० वर्षे आणि कलम ८ खाली प्रत्येकी ४ वर्षे सश्रम कारावास तसेच भादंवि कलम ५०६ खाली दोघांनाही प्रत्येकी एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. पीडितेच्या मावशीला भादंवि कलम ५०६ खाली ३ महिन्यांचा कारावास सुनावला. अॅड. अविनाश कोकाटे यांनी सरकार पक्षाला साहाय्य केले.