मामा म्हणाला,मुलीचे आधी शिक्षण, मग लग्न; विकृत भाच्याने 'तिचे' एडीटेड फोटो केले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 08:23 PM2023-06-06T20:23:33+5:302023-06-06T20:25:46+5:30
एकतर्फी प्रेमातून भाच्याचा लग्नाचा हट्ट, अखेर भाच्याविरोधातच पोलिसांकडे तक्रार देण्याची वेळ
छत्रपती संभाजीनगर : एकाच गावात राहणाऱ्या मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेमातून भाच्याने लग्नाचा हट्ट सुरू केला. मामाने मात्र मुलीला शिकवायचे असल्याने स्पष्ट नकार दिला. त्याचा राग मनात धरुन भाच्च्याने मामाच्या मुलीचे फोटो एडिट करुन, व्हिडिओ तयार करुन सोशल मिडियावर अपलोड करण्यास सुरू केले. परिणामी, दोन्ही कुटूंबात वाद वाढले व मामाला अखेर सख्या भाच्या विरोधातच पोलिसांकडे जाण्याची वेळ आली. सायबर पोलिस ठाण्यात याप्रकरणी २३ वर्षीय रवी (नाव काल्पनिक आहे) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सिल्लोड तालुक्यात राहणारा रवी सुरूवातीला काही दिवस गावातच राहत होता. मामाचे कुटूंब देखील गावातच राहत असल्याने दोन्ही कुटूूंबात चांगले संबंध होते. सुशिक्षित असलेल्या रवीला मामाच्या मुलीसोबत लग्न करण्याचा विचार हाेता. काही दिवसांपूर्वीच रवीने तशी इच्छा देखील व्यक्त केली. मात्र, मामाने त्यास स्पष्ट नकार दिला. परिणामी, दोन्ही कुटूंबात वाईटपणा येण्यास सुरूवात झाली. वारंवार समजावून सांगूनही रवी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
विकृतीवर उतरला रवी
रवीने मे महिन्यात पहिल्यांदा मामाच्या मुलीचे छायाचित्र विनाकारण अपलोड करण्यास सुरूवात केले. मामाच्या कुटूंबाने समजावून सांगून ते डिलिट करण्यास सांगितले. मात्र, रवीने विकृत प्रकार सुरूच ठेवले. तीचे छायाचित्र एडिट करुन, व्हिडिओ तयार करुन व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवणे, सोशल मिडियावर अपलोड केले. १९ मे ते २ जुन दरम्यान त्याने हा प्रकार केला. त्याचे प्रकार थांबत नसल्याचे लक्षात आल्यावर मामाने अखेर पोलिस अधीक्षक कार्यालयातील ग्रामिण सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी त्यावरुन तत्काळ रवीवर भादवी कलम ६६ सी आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक देविदास गात याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
आठवड्यातला दुसरा प्रकार
एकतर्फी प्रेमातून साेशल मिडियावर महिले विषयी आक्षेपार्ह पोस्ट करण्याचा हा आठवड्यातला दुसरा प्रकार समोर आला. ३१ मे वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. विवाहितेच्या सोशल मिडियावर अकांऊट वर अश्लिल कमेंट करुन ते व्हायरल केले. आरोपीने मुलीच्या नावाने अकाऊंट उघडून हे प्रकार सुरू केले होते.