अनियंत्रित कार मजुरांसाठी ठरली काळ; पाचोड रोडवर दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 04:53 PM2023-02-22T16:53:47+5:302023-02-22T16:54:40+5:30
अपघातानंतर चालकासह कारमधील सर्व प्रवाशी तेथून निघून गेले; मृत दोघेही परप्रांतीय मजूर असल्याची माहिती
- संजय जाधव
पैठण (औरंगाबाद) : पैठण-पाचोड रोडवर कार व मोटारसायकल दरम्यान झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील दोन जण जागीच ठार झाले. बुधवारी दुपारी २.३० दरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात उलटली तर मोटारसायकल रस्त्याच्या कडेल्या केबलसाठी खोदलेल्या २० फूट खोल नालीत पडली. दोघेही हजारीबाग झारखंड येथील मजूर असल्याचे कळते.
पैठण शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर पाचोड-पैठण रस्त्याने दोघे मजूर मोटारसायकलने पैठणकडे येत असताना कार क्र एम एच -२० बी एन ९११४ या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने पाठिमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना उडवून दिले. कार रस्त्याच्या बाजूला खोदकामाने झालेले वळण पार करून उत्तमराव जाधव यांच्या शेतात जाऊन पलटी झाली. अपघाताची खबर मिळताच पोलीस उपनिरीक्षक दशरथ बरकुल, पोलीस हवालदार गोपाळ पाटील, श्रीराम चेडे, राम मोळके, स्वप्नील दिलवाले, व राजू जीवडे आदींनी घटनास्थळी जाऊन मोटारसायकल वरील दोघांना पैठण येथील शासकीय रुग्णालयात हलवले डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले.
अपघातानंतर कारचालकासह कारमधील सर्व प्रवाशी तेथून निघून गेले होते. यामुळे कार कुणाची आहे, कारमध्ये किती जण होते, या बाबत काहीच समजू शकले नाही. पोलीसाकडून या बाबत माहिती घेण्याचे काम सुरू होते. कारचे सीट रक्ताने माखलेले होते. कारमध्ये लेडीज सँडल व चिप्स, पाणी असे साहित्य दिसून आले आहे. पैठण-पाचोड रोडचे रूंदीकरण झाल्याने रस्त्यावरील वाहनांचा वेग अत्यंत वाढला असून वारंवार या रस्त्यावर अपघात होत आहेत.