उंडणगावात भाजपला स्पष्ट बहुमत असूनही धाकधूक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:07 AM2021-02-05T04:07:37+5:302021-02-05T04:07:37+5:30
उंडणगाव : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला धूळ चारत, भाजपने या ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकविला आहे. १७ ...
उंडणगाव : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला धूळ चारत, भाजपने या ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकविला आहे. १७ पैकी १० सदस्य निवडून आले आहेत; मात्र आज होणाऱ्या सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये १० उमेदवार म्हणजे स्पष्ट बहुमत घेऊनसुद्धा एसटी आणि एससी सदस्य नसल्यामुळे भाजपची गोची होण्याची शक्यता आहे. या प्रवर्गातील आरक्षण निघाल्यास मात्र भाजपची नक्कीच डोकेदुखी वाढणार आहे. ही चर्चा गावात चांगलीच रंगली असून, भाजप पॅनलप्रमुखांची धाकधूक वाढली आहे.
उंडणगाव ग्रामपंचायतीवर अगोदर शिवसेना पक्षाची सत्ता होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये गावातील मतदारांनी सत्ताधारी पक्षांना स्पष्ट डावलून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात ही ग्रामपंचायत दिली आहे. १७ जागेपैकी १० ठिकाणी भाजपाचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत. तर शिवसेनेकडे फक्त ६ सदस्य आहेत, तर शिवसेनेकडे ६ सदस्यांमध्ये एसटी-पुरुष, एसटी-महिला व एससी प्रवर्गातील महिला असे सदस्य असल्याने त्यांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
तर भाजपच्या गोठामध्ये आशांतता पसरलेली आहे. एखाद्या वेळेस जर कधी एसटी व एससी अशा प्रवर्गातील आरक्षण निघाल्यास नक्कीच भाजपच्या अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे गावात एकच चर्चा रंगू लागली असून, नेमके सरपंचपद कोणत्या प्रवर्गात निघते, कोणत्या गटाला साथ मिळते. यावरच आता पुढचे गावाचे भवितव्याचे चित्र ठरणार आहे.
भाजपच्या गटातील नेत्यांनी इतर प्रवर्गातील आरक्षण निघू नये, यासाठी देव पाण्यात ठेवले आहे. तर शिवसेनेच्या गोटात थोड्या आनंदाचे वातावरण वाहू लागले आहे. कारण सरपंचपद मिळविण्यासाठी त्यांनीही देवाला इतर प्रवर्गातील आरक्षण निघावे, यासाठी देवाला नवस कबूल केलाच असेल असे म्हटले तर वावगे ठरू नये.