उंडणगावातील प्रा. आ. केंद्रात लसीकरणाबाबत सावळा गोंधळ - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:02 AM2021-04-29T04:02:11+5:302021-04-29T04:02:11+5:30
उंडणगाव : लस दिलेल्या नागरिकांची नोंदणी करण्यासाठी संगणकच नसल्याने मोबाइलवरच व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्य केंद्रात ...
उंडणगाव : लस दिलेल्या नागरिकांची नोंदणी करण्यासाठी संगणकच नसल्याने मोबाइलवरच व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्य केंद्रात व्हेरिफिकेशन करण्यासाठी तासंतास ताटकळत बसण्याची वेळ आली आहे.
आरोग्य केंद्रात संगणक अद्ययावत करून नागरिकांच्या नोंदी व्हेरिफिकेशन करण्यासाठी येथे संगणक व इंटरनेट उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार होऊ नये यासाठी सध्या लसीकरण करण्यात येत आहे. नागरिकांची ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर त्यांना लस देण्यात येते. त्यानंतर घेतलेल्या लसीच्या डोसचे व्हेरिफिकेशन करण्यात येते.
आरोग्य केंद्रातील कर्मचारी हे व्हेरिफिकेशन करतात. मात्र सध्या मोबाइलद्वारेच व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रात संगणक सुरू नाही. तसेच इंटरनेटसेवासुद्धा उपलब्ध नाही. त्यामुळे व्हेरिफिकेशन करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लस घेतल्यानंतर आधार कार्ड, लसीकरण झालेल्या नागरिकांच्या फोटोचे व्यवस्थित व्हेरिफिकेशन करून त्याच दिवसभराची माहिती ही शासनाला पाठविण्यात येते. सध्या हे काम प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी आपल्या मोबाइलवर करीत आहेत.
आरोग्य केंद्राव्यतिरिक्त नागरिकांची गर्दी
उंडणगाव आरोग्य केंद्राला लस पुरवठा करण्याची मागणी
उंडणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत २२ गावे येतात. या आरोग्य केंद्रा अंतर्गत गावांची लोकसंख्या ही ५४,३४९ आहे. तर त्यात ४५ वर्षे वयोगटातील किमान ३४ हजार नागरिक आहेत. या आरोग्य केंद्रात आतापर्यंत फक्त २,०१५ नागरिकांना लस देण्यात आली आहे. येथे मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून सर्वांना लस देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.