मोंढ्यात फुटलेली जलवाहिनी सिमेंटच्या रस्त्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:04 AM2021-01-08T04:04:51+5:302021-01-08T04:04:51+5:30
औरंगाबाद : जुन्या मोंढ्यात मागील महिनाभरापासून जलवाहिनी फुटली आहे. १० फूट खोदल्यानंतर कळले की, ही जलवाहिनी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याखाली ...
औरंगाबाद : जुन्या मोंढ्यात मागील महिनाभरापासून जलवाहिनी फुटली आहे. १० फूट खोदल्यानंतर कळले की, ही जलवाहिनी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याखाली दबली आहे. सिमेंटचा रस्ता फोडण्यासाठी अजून मनपाकडून परवानगी मिळाली नसल्याने दररोज शेकडो लीटर पाणी वाहून जात आहे.
जलवाहिनी व ड्रेनेज लाइनसाठी वेगळी व्यवस्था करून नंतर सिमेंटचे रस्ते तयार करण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन जिल्हा व्यापारी महासंघाने मनपा आयुक्तांना दिले होते. पण या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले व शहरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केले जात आहे. मनपाच्या नियोजनशून्य कारभाराचे उत्तम उदाहरण जुन्या मोंढ्यात फुटलेली जलवाहिनी ठरत असल्याचा आरोप जनरल किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश सेठी यांनी केला आहे.
मोंढ्यातील सर्कलच्या बाजूला महिनाभरापूर्वी जलवाहिनी फुटली होती. या जलवाहिनीद्वारे संजयनगर येथील जलकुंभाला पाणीपुरवठा होतो. जिथून पाणी वरती येते त्याठिकाणी १० फूट खड्डे खोदण्यात आले; पण जलवाहिनी सापडली नाही. यामुळे ठेकेदाराने सिमेंटच्या रस्त्याखाली ५ ते ६ फूट खोदण्यात आले; पण जलवाहिनी सापडली नाही. यामुळे आता सहा महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेला सिमेंटचा रस्ता फोडावा लागणार आहे.
यासंदर्भात मनपाचे उपअभियंता अरुण मोरे यांनी सांगितले की, सिमेंटचा रस्ता फोडण्याची परवानगी मिळाल्यावर पाइपलाइन दुरुस्त करण्यात येईल.
चौकट
गाय पडली खड्ड्यात
फुटलेल्या जलवाहिनीचे पाणी संपूर्ण मोंढ्यातून वाहत जाफरगेटपर्यंत जात आहे. खड्डे व चिखल यामुळे दररोज लोडिंग रिक्षा स्लिप होणे व घसरून नागरिक पडत आहेत. तसेच खोदलेल्या खड्ड्यात दोन दिवसांपूर्वी गाय पडली होती. टेम्पोवाल्यांनी त्या गाईला बाहेर काढले.
सतीशचंद्र सिकची
ज्येष्ठ व्यापारी
जुन्या मोंढ्यात मुख्य पाइपलाइनवरच सिमेंटचा रस्ता तयार केला आहे. येथील मुख्य जलवाहिनी फुटून महिना उलटला आहे. मात्र, सिमेंट रस्ता फोडण्यास परवानगी मिळत नसल्याने दररोज हजारो लीटर पाणी वाहून जात आहे. खड्डे व चिखल यामुळे दररोज येथे नागरिक घसरून पडत आहे.
चौकट
जुन्या मोंढ्यात जलवाहिनी फुटली. तिचा शोध घेण्यासाठी असे खड्डे करून ठेवले; पण जलवाहिनी सापडली नाही. त्यासाठी आता सहा महिन्यांपूर्वी तयार केलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता फोडावा लागेल, अशी माहिती मनपाच्या अभियंत्यांनी दिली.