होमगार्ड कवायत पोलिसांच्या नियंत्रणात
By Admin | Published: May 23, 2016 11:24 PM2016-05-23T23:24:51+5:302016-05-24T01:07:08+5:30
शेषराव वायाळ , परतूर होमगार्डसची कवायत आता पोलिसांच्या नियंत्रणाखाली आली असून, पोलिसांनी मागील पंधरा दिवसांपासून याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
शेषराव वायाळ , परतूर
होमगार्डसची कवायत आता पोलिसांच्या नियंत्रणाखाली आली असून, पोलिसांनी मागील पंधरा दिवसांपासून याची अंमलबजावणी सुरू केली आहे. यामुळे आता गृहरक्षक दलात अमूलाग्र बदल होत असताना दिसत आहे.
गृहरक्षक दलाची कवायत पूर्वी त्यांच्या स्तरावरच महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या रविवारी घेतली जायची. आता ही कवायत महाराष्ट्र गृहरक्षक दल मुंबई येथून एका आदेशान्वये पोलिसांच्या नियंत्रणाखाली आणण्यात आली आहे. यामुळे कवायतीची संख्या वाढत आहे. यातून पोलिस भरतीस लाभ होतो की काय, अशीही भावना होमगार्डसमध्ये निर्माण झाली आहे. परतूर तालुक्यात सध्या १०० होमगार्डसची संख्या तर जिल्ह्यात ५०० च्या वर होमगार्डस कर्तव्यावर आहेत. होमगार्डसना सध्या पोलिस दलात ५ टक्के राखीव जागा देण्यात आल्या आहेत. तसेच कर्तव्यावर असताना ४०० रुपये दररोज दिले जातात. तर कवायतीचा भत्ता १०० रुपये दिला जातो. गृहरक्षक दलाची कवायत पोलिसांच्या नियंत्रणात आल्याने होमगार्डमध्येही उत्साह निर्माण झाला आहे. याबरोबरच गृहरक्षक दलात शिस्तही वाढली आहे. एकूणच अहोरात्र कर्तव्य पार पाडून फारसा लाभ मिळत नसलेल्या गृहरक्षक दलातील मरगळ आता दूर होताना दिसत आहे. (वार्ताहर)
यासंदर्भात परतूर तालुका प्रभारी समादेशक एस.एल. काकडे म्हणाले की, गृहरक्षक दलाचे काम जिल्हा समादेशक तथा अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या नियंत्रणाखाली प्रभावीपणे सुरू आहे. आमची कवायत पोलिसांकडे गेल्याने एक वेगळी शिस्त निर्माण होऊन होमगार्ड चांगले प्रशिक्षित होतील, असेही तालुका समादेशक काकडे यांनी सांगितले.