कोणत्याही परिस्थितीत गंगापूर कारखान्याची विक्री होऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:03 AM2021-03-25T04:03:57+5:302021-03-25T04:03:57+5:30
गंगापूर : गंगापूर सहकारी साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत विक्री होऊ न देता. तो शेतकऱ्यांच्या मालकीचा राहण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार ...
गंगापूर : गंगापूर सहकारी साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत विक्री होऊ न देता. तो शेतकऱ्यांच्या मालकीचा राहण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे कारखान्याचे माजी अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी जाहीर केले. त्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याचीदेखील तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. कारखाना परिसरात शेतकरी व कामगारांच्या उपस्थितीत बुधवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे बोलताना कृष्णा पाटील म्हणाले की, १९६८ मध्ये बाळासाहेब पवारांनी खासगीतून सहकारी केलेला गंगापूर कारखाना हा राज्यातील पहिला साखर कारखाना आहे. दोन हजार टन गाळप क्षमता असलेल्या या कारखान्याची अडीचशे कोटीची संपत्ती असून यामध्ये दोनशे एकर क्षेत्र, तीनशे लिटरचा डिस्टिलरी प्लँट व इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. तालुक्याचे वैभव असलेला हा कारखाना २००८ पासून बंद असल्याने थकबाकीपोटी राज्य सहकारी बँकेने सदरील कारखाना विक्रीसाठी अथवा भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
कामगारांचे १५ कोटी थकीत वेतन बाकी आहे. कारखाना विक्री झाल्यास त्यांचे नुकसान होणार असून शेतकऱ्यांची मालकीदेखील संपुष्टात येणार असल्याने कोट्यवधीचा हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत कवडी मोल भावाने विक्री होऊ देणार नसून, कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी आमची कोणतीही हरकत नसेल, मात्र विक्रीविरोधात वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी आहे. त्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे कृष्णा पाटील यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला कारखाना संचालक संजय जाधव, दिलीप बनकर, माजी संचालक, भागवत काळे, ऊस उत्पादक भाऊसाहेब शेळके, कामगार प्रतिनिधी विठ्ठल कुंजर, अरुण वावरे, महेश गुजर, शिवाजी बोडके, अमोल वरकड, राजू निकमसह आदींची उपस्थिती होती.