लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेचे मंगळसूत्र पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 07:56 PM2021-02-20T19:56:12+5:302021-02-20T19:58:12+5:30
Chain Snatching शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास महिला पदमपुरा येथून घरी पायी जात होत्या.
औरंगाबाद : धुणीभांडी करून पायी घरी जाणाऱ्या ६६ वर्षीय महिलेला दुचाकीवर लिफ्ट देण्याचा बहाणा करून भामट्याने त्यांचे सोन्याचे मंगळसूत्र पळविल्याची घटना १९ फेब्रुवारीला सायंकाळी देवानगरीत घडली. याविषयी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार अनुसया प्रकाश फुलझाडे (रा. देवानगरी परिसर) या धुणीभांडी करून उपजीविका करतात. शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्या पदमपुरा येथून घरी पायी जात होत्या. रस्त्यात त्यांना अनोळखी दुचाकीस्वाराने थांबवून आई तुम्हाला कुठे जायचे? असे विचारले. फुलझाडे यांनी देवानगरी असे सांगताच बसा गाडीवर मी तुम्हाला तेथे नेऊन सोडतो असे म्हणून त्याने त्यांना मोटारसायकलवर बसविले. शहानूरमिया दर्गा चौकातून तो त्यांना घेऊन उलटसाईडने देवानगरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर घेऊन गेला.
तेथे त्यांना दुचाकीवरून खाली उतरवून त्याने त्यांना समोहित करून त्यांच्याकडून गळ्यातील सोन्याचे दोन ग्रॅमचे मनीमंगळसूत्र काढून स्वतःकडे घेतले आणि तो दुचाकीवर बसून पसार झाला. काही वेळानंतर फुलझाडे यांना हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी उस्मानपुरा ठाणे गाठून तक्रार नोंदविली. या घटनेची माहिती कळताच सहायक पोलीस आयुक्त रवींद्र साळोखे, पोलीस निरीक्षक दिलीप तारे, फौजदार वाघ आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.