शिक्षकाच्या निगराणीला वानरसेना, शाळेवर भरलेल्या वर्गाची चर्चा रंगली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 08:28 PM2022-09-12T20:28:08+5:302022-09-12T20:28:48+5:30
खुलताबाद तालुक्यातील घोडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर बसलेले वानर शिक्षकांवर नजर ठेवून तर नाही ना अशीच चर्चा सोशलमिडीयावर होत आहे.
- सुनील घोडके
खुलताबाद (औरंगाबाद) : गंगापूर- खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रशांत बंब यांनी मांडलेला जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी मुख्यालयी राहावे हा विषय सध्या राज्यभरात गाजत आहे. त्यातच तालुक्यातील गदाना जिल्हा परिषदेच्या शाळेवर वानरसेनेच्या भरलेल्या वर्ग कुतूहलाचा विषय ठरत आहे. दरम्यान, शिक्षकांच्या निगराणीला वानरसेना, असे कॅप्शन देऊन हा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
खुलताबाद तालुक्यातील घोडेगाव जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर मोठ्या प्रमाणावर वानर बसलेले होते. हा फोटो काही वेळातच सोशल मिडीयावर व्हायरल झाला. दरम्यान, शिक्षकांच्या निगराणीला वानरसेना, सीसीटीव्ही कॅमेरा असे कॅप्शन देऊन हा फोटो शिक्षक आणि गावकऱ्यांच्या ग्रुपमध्ये फिरत आहे.
गंगापूर- खुलताबादचे आ. प्रशांत बंब यांनी शिक्षकांना मुख्यालयी राहावेच लागेल जे राहत नाहीत, अशा शिक्षकांचे वेतन बंद करण्यात यावे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र दिले आहे. याच पार्श्वभूमीवर हा फोटो शिक्षकांच्या समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणावर फिरत असून शिक्षकांवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर (सीसीटीव्ही कॅमेरा) म्हणून उल्लेख केला आहे. त्यामुळे मोठी चर्चा होत आहे.