संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाखालील भुयारी मार्ग देशासाठी ठरेल मॉडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 06:00 PM2018-08-13T18:00:44+5:302018-08-13T18:02:13+5:30
संग्रामनगर रेल्वेफाटक बंद झाल्यापासून रहिवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पुलाखाली भुयारी मार्ग उभारण्याच्या कामाचा रविवारी शुभारंभ झाला.
औरंगाबाद : संग्रामनगर रेल्वेफाटक बंद झाल्यापासून रहिवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पुलाखाली भुयारी मार्ग उभारण्याच्या कामाचा रविवारी शुभारंभ झाला. हा भुयारी मार्ग देशासाठी मॉडेल ठरणार असून, यापुढे रेल्वे उड्डाणपूल होईल तेथे भुयारी मार्ग उभारेल, असा निर्णय घेण्यात आल्याचे ‘दमरे’चे वरिष्ठ मंडळ अभियंता डी.डी. नागपुरे यांनी सांगितले.
संग्रामनगर रेल्वे फाटकाजवळ भुयारी मार्गाचे भूमिपूजन अणि कोनशिला स्थापना समारंभ रविवारी (दि.१२) खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेविका शोभा बुरांडे, स्मिता घोगरे, मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा, मेट्रो असोसिएशनचे श्रीमंत गोर्डे पाटील, डॉ. प्रेम खडकीकर, शिवानंद वाडकर, प्रदीप बुरांडे, किशोर शितोळे, भाऊ सुरडकर, ‘दमरे’चे मंडळ अभियंता सुजितकुमार, सहायक अभियंता खोब्रे आदी उपस्थित होते.
डी.डी. नागपुरे म्हणाले की, संग्रामनगरमुळे ‘संग्राम’ झाला आहे. रेल्वे उड्डाणपूल होईल तेथे भुयारी मार्ग करण्याचे धोरण ठरविण्यात आले. त्याचा देशभरात फायदा होईल. खा. खैरे म्हणाले की, उड्डाणपूल झाल्यानंतर फाटक बंद करण्याचा रेल्वेचा नियम आहे. नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली; परंतु फाटक बंद करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. संग्रामनगर येथील नागरिकांमुळे रेल्वेचा नियम बदलला. भुयारी मार्गाचे काम सुरू झाले. त्याचा देशासाठी फायदा झाला. रेल्वेस्टेशन एमआयडीसीतून बायपासला जोडणाऱ्या पुलासाठी ‘एमआयडीसी’ने पैसे दिले पाहिजेत.
नागरिकांची दिवाळी
दोन वर्षांपूर्वी रेल्वे फाटक बंद केले. ये-जा करण्यासाठी होणाऱ्या अडचणींमुळे नागरिकांनी आंदोलन केले. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडे चकरा माराव्या लागल्या. निधीचा प्रश्न होता. या सगळ्या अडचणींनंतर भुयारी मार्गाचे काम सुरू झाले. भुयारी मार्ग झाल्यानंतर नागरिक खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील, असे श्रीमंत गोर्डे पाटील म्हणाले.