मुले पळविणारे समजून दोन बहुरूप्यांना जमावाकडून बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:15 AM2018-06-16T00:15:51+5:302018-06-16T00:16:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : चोर समजून आठ दिवसांपूर्वी वैजापूर तालुक्यातील चांदगाव येथे गावकऱ्यांच्या मारहाणीत दोन जणांचा मृत्यू झाल्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चोर समजून आठ दिवसांपूर्वी वैजापूर तालुक्यातील चांदगाव येथे गावकऱ्यांच्या मारहाणीत दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा परिसरात शुक्र वारी सकाळी मुले पळविणारे असल्याचे समजून शेकडो लोकांनी दोन बहुरूप्यांना बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांची सुटका करून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले.
मोहननाथ भैरूनाथ सोडा (३८) आणि विक्रमनाथ लालूनाथ भाटी (३५, दोघे रा. हर्सूल सावंगी, मूळ रा. मध्यप्रदेश), अशी मारहाणीत जखमी झालेल्या बहुरूप्यांची नावे आहेत. यापैकी मोहननाथ यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना अतीव दक्षता कक्षात दाखल करण्यात आले.
छावणी पोलिसांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात मुले पळविणारी टोळी आणि चोरटे फिरत असल्याच्या अफवांचे पेव फुटले आहे. त्यामुळे चोर समजून वाटसरूंनाही मारहाण होण्याच्या घटना घडत आहेत. पडेगाव परिसरातील विविध वसाहतींमध्ये गुरुवारी रात्री लहान मुले पळवून नेऊन त्यांची किडनी विकणारे आणि लहान मुलांना कापून त्यांचे काळीज खाणारे लोक फिरत असल्याची अफवा पसरली होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी बहुरूपी मोहननाथ आणि विक्रमनाथ हे पडेगाव परिसरातील नवीन वसाहतीत भिक्षा मागण्यासाठी गेले. शरीराने मजबूत आणि डोक्याचे
केस, दाढीचे खुंट वाढलेल्या अवस्थेतील दोघांना पाहून ते मुले पळविणारेच असल्याचा नागरिकांचा समज झाला. त्यांना पाहताच नागरिकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. बघता-बघता सुमारे दीडशे ते दोनशे नागरिक जमा झाले आणि त्यांनी दोघांना मारहाण केली.
दरम्यान, नागरिकांनी त्यांची चौकशीही सुरू केली. मारहाण होत असताना दोघेही ‘आम्ही बहुरूपी आहोत’, असे ओरडून सांगत होते. मात्र, कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. येईल तो प्रत्येक नागरिक त्यांना एक-दोन फटके देत होता. यामुळे दोघेही रक्तबंबाळ झाले.
पोलीस धावले
या घटनेची माहिती छावणी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा शेकडो लोकांचे दोन गट मोहननाथ आणि विक्रमनाथला वेगवेगळे घेरून मारहाण करीत होते. या मारहाणीमुळे त्यांच्या अंगावरील कपडे त्यांनी फाडले होते. नागरिकांच्या तावडीतून त्यांची सुटका करून गंभीर जखमी अवस्थेत त्यांना घाटीत दाखल करण्यात आले.