केवळ युद्धांचा नव्हे, तर सामाजिक अंगाचा इतिहास समजून घेणे ही काळाची गरज : शिवानंद भानुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 01:00 PM2021-02-13T13:00:32+5:302021-02-13T13:01:57+5:30
Speech on Shivaji Maharaj सर्व घटकांना सन्मानपूर्वक वागवणारा राजा म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे.
औरंगाबाद : केवळ ढाल, तलवारी व युद्धांचा इतिहास नव्हे, तर सामाजिक अंगाचा इतिहास असला पाहिजे. शिवाजी महाराजांना केवळ मुस्लीमद्वेष्टे राजे म्हणून बघितले गेले आहे. त्यामुळे इतिहासाची चिकित्सा करताना खरा इतिहास समजून घेतला पाहिजे, ही आज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. शिवानंद भानुसे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रातर्फे आयोजित ‘लिंगभाव चर्चाविश्व’ या दहा दिवशीय व्याख्यानमालेत डॉ. भानुसे बोलत होते. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा महिला विषयक वा सामाजिक दृष्टीकोन‘ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, शिवाजीराजे हे जनतेच्या मनावर राज्य करणारे होते आज मात्र लोकशाहीच्या काळात हे चित्र फार उदासीनतेच्या दिशेने नेणारे आहे. शिवाजी महाराजांची प्रेरणा ह्या जिजाऊ होत्या. अठरापगड जातींना एकत्र करून मावळा हा शब्द त्यांनी दिला तसेच स्वराज्य मध्ये स्त्रिया ह्या निर्भीड पणाने वावरत होत्या. स्त्रियांसोबत गैरवर्तन होऊ नये, यासाठी कडक शिक्षा व कायदे होते. त्यामुळे शत्रूंची स्त्रियांना देखील सन्मानाने वागणूक त्याकाळात मिळत होती. त्यामुळे सर्व घटकांना सन्मानपूर्वक वागवणारा राजा म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे.
पाहुण्यांचा परिचय प्रा. मंजुश्री लांडगे यांनी करुन दिला व आभार मानले. या व्याख्यानासाठी प्रा. डॉ. पुष्पा गायकवाड, डॉ. संबोधी देशपांडे, डॉ. ज्योत्स्ना सांगारी, डॉ. शोभा शिंदे, केंद्राच्या संचालक डॉ. स्मिता अवचार, विभागातील संशोधक विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते. या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. निर्मला जाधव, समन्वयक प्रा. अश्विनी मोरे, डॉ. सविता बहिरट, संतोष लोखंडे, डॉ. विकास वाचले, संजय पोळ आदींनी परिश्रम घेतले.